पत्रकारांनी पत्रकारीतेविषयी समर्पणाची भावना ठेवून वंचितांना न्याय देण्याचे कार्य करावे – यदु जोशी

0
18

वाशीम,दि.11 : पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आहे. समाजमान्य पत्रकारांकडे फार मोठ्या अपेक्षेने पाहत असतो. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारीतेविषयी समर्पणाची भावना ठेवून वंचितांना न्याय देण्याचे कार्य सदोदीत करावे असे प्रतिपादन दैनिक लोकमतचे मंत्रालय प्रतिनिधी तथा राज्य अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी केले.

श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 10 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये पत्रकारांसाठी एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी राजकीय पत्रकारिता या विषयावर ते बोलत होते. प्रथम सत्रात आयोजीत कार्यक्रमात मंचावर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. हर्षदाताई देशमुख ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून यदु जोशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, विदर्भ मतदारचे मुख्य संपादक अ‍ॅड. दिलीप एडतकर, दैनिक लोकमत नागपूरचे निवासी संपादक गजानन जानभोर, दैनिक सकाळ नागपुरचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, दैनिक लोकसत्ता नागपूरचे संपादकीय प्रमुख देवेंद्र गावंडे, नागेश घोपे, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार, जिल्हा सचिव चंद्रकांत लोहाणा, प्रदीप टाकळकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला. यावेळी चेतन सेवांकुर ग्रुपच्या अंध चिमुकल्यांनी उत्कृष्टरित्या स्वागत गित गावून मान्यवरांच्या आपल्या शैलीत स्वागत केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन चाफेश्‍वर गांगवे यांनी केले.

प्रास्ताविकातून डॉ. प्रकाश कापुरे यांनी कार्यशाळा घेण्याचे उद्दीष्ट स्पष्ट करुन श्रमिक पत्रकार संघाने आजतागायत जिल्हयात राबविलेल्या विविध कार्याची माहिती दिली. त्यामध्ये नवदुर्गा उत्सवाच्या निमित्ताने नऊ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, रक्तदान, स्वच्छता अभियान आदी कार्यक्रम वैशिष्ट्यपुर्ण ठरले असल्याचे कापुरे म्हणाले. त्यानंतर मनोगतातून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी कार्यशाळेचे महत्व विषद करुन ही कार्यशाळा जिल्हयातील पत्रकारांसाठी मोठी पर्वणी असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून बोलतांना सौ. हर्षदाताई देशमुख म्हणाल्या की, आज प्रसारमाध्यमांमध्ये मोठा बदल होत असून पत्रकारांची भूमिका आणि जबाबदारी वाढली आहे. पत्रकार हा तळागाळातील वंचितांना न्याय देण्याचे काम करुन अन्यायाला जनतेसमोर आणण्याचे काम करीत असतो.

राजकीय पत्रकारीता या विषयावर बोलतांना यदु जोशी यांनी अनेक संवेदनशील विषयाला हात घालुन उपस्थित पत्रकारांसमोर मार्मीक व स्पष्ट शब्दात राजकीय पत्रकारीता या विषयावर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मी वाशीममध्ये प्रथमच आलो असून माझे गाव जळगाव जामोद हे आहे. त्यामुळे साहजिकच विदर्भाशी माझी जवळीक आहे. पत्रकारीतेत मी अपघातानेच आलो. राजकारण किंवा पत्रकारीता ही दोनच ध्येय समोर ठेवून मी वाटचाल केली व पत्रकार झालो. आजच्या बदलत्या युगात पत्रकारांचे महत्व कमी झाले नसले तरी पत्रकारांपुढील समस्या मात्र आजही कायम आहेत. त्या समस्या सोडवून पत्रकारांशी वंचितांना न्याय देण्याचे कार्य केले पाहीजे. दिवसभर तुम्ही कितीही पत्रकारीता केली असली तरी रात्री घरी गेल्यावर तुमचे महत्व तुम्हाला कळते. कारण आयुष्यातील सर्व रस्ते पोटातून जातात. मी अधिस्विकृती समितीचा अध्यक्ष झाल्यावर या समितीमधील अनेक जाचक नियम मी बाजुला ठेवून खर्‍या पत्रकारांना न्याय देण्याचे कार्य केले. पत्रकारांच्या एका बातमीमुळे कुणाचे जीवन वाचते ही फार मोठी समाधानाची बाब आहे. या सरकारने पत्रकारांसाठी घेतलेेले निर्णय कौतुकास्पद असून पत्रकार पेन्शन योजनेमुळे अनेक पत्रकारांना न्याय मिळाला आहे. याप्रसंगी त्यांनी आपल्या पत्रकारीतेतील अनेक कडूगोड आठवणी विषद केल्या. राजकीय पत्रकारीतेबद्दल बोलतांना ते म्हणाले की, सरकार बदलले तरी कंत्राटदार बदलत नाहीत. कंत्राटदार तेच राहतात. पत्रकारांनी न्यायाधिश बनण्यापेक्षा आपल्या लेखणीतुन लोकप्रतिनिधींना त्यांच्या कर्तव्याची वेळावेळी जाणीव करुन द्यावी.
सामाजीक जाणीवेतून पत्रकारीता या विषयावर मार्गदर्शन करतांना लोकमत नागपूरचे निवासी संपादक गजानन जानभोर म्हणाले की, कार्यशाळा वनवे असु नये. मुंबई पुण्यातील शहरी भागातील पत्रकारांना विविध संरक्षक कवचकुंडले असतात. परंतु खर्‍या अर्थाने पत्रकारीता करणार्‍या ग्रामीण भागातील पत्रकारांना कोणतीही सुरक्षा नसते. ग्रामीण भागातील वार्ताहर हेच खर्‍या अर्थाने पत्रकारीता करतात. मोठ्या पत्रकारांनी मोठ्या व्यक्तींवर टिका केली तर काही बिघडत नाही. परंतु वार्ताहरांनी सरपंचाच्या विरोधात लिहीले तरी त्याच्या जिवाला धोका पोहोचतो. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ग्रामीण वार्ताहरांचा फार मोठा वाटा आहे. पत्रकारीता ही पैसा कमविण्याचे साधन नसून पत्रकारीते येणारे जिद्द ठेवूनच पत्रकारीतेत येतात. ग्रामीण वार्ताहर हा खर्‍या अर्थाने सामाजीक कार्यकर्ता आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या एका बातमीमुळे अनेकांचे संसार फुलले असून त्याचे जिवंत उदाहरण अंध चेतन उचितकर आहे. पत्रकार हा बनविला जात नाही तर तो परिस्थितीतून तयार होतो. ग्रामीण भागातील वार्ताहरांना संरक्षण व सुविधा देण्याची गरज असून ग्रामीण पत्रकारीता वाढविण्याची आज खरी गरज आहे. पत्रकारीता करण्यासाठी कोणत्याही मास कम्युनिकेशनची किंवा जर्नलिझमची गरज नसते. त्यासाठी संवेदना असाव्या लागतात. पत्रकारीता व्यवसायात व्याभिचार करणार्‍या वर्तमानपत्राचा मृत्यु अटळ आहे. लोकशाही जिवंत ठेवण्याचे खरे काम ग्रामीण वार्ताहर करत असतो.
प्रतिकुल परिस्थीतीत पत्रकारीता या विषयावर बोलतांना दैनिक लोकसत्ता नागपूरचे संपादकीय प्रमुख देवेंद्र गावंडे म्हणाले की, पत्रकारीतेत उपप्रादेशीक वाद हा चिंतेचा विषय आहे. विदर्भातील अनुशेष, सुविधा, विकास या विषयावर येथील पत्रकार लिखाण करत नाहीत. त्यामुळे वर्तमानपत्राच्या विदर्भ पानावर छापण्यासाठी बातम्याच नसतात. पत्रकारांनी आपला दृष्टीकोन व्यापक ठेवावा.