२२ व २३ मार्चला गडचिरोलीत जनसंघर्षांची राष्ट्रीय परिषद

0
14

गडचिरोली, — अलिकडच्या काळात व्यवस्थेत होत असलेल्या बदलांमुळे आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, महिला व कष्टक-यांचे मोठया प्रमाणावर शोषण व्हायला लागले असून, धार्मिक व जातीय अत्याचारांनाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. या व्यवस्थेविरुदध संघर्षाचा एक भाग म्हणून गडचिरोली येथे २२ व २३ मार्च रोजी जनसंघर्षांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
२२ मार्चला दुपारी १२ वाजता गडचिरोली येथील आरमोरी मार्गावरील संस्कृती सभागृहातील शहीद बिरसा मुंडा परिषदस्थळी होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन सुप्रसिद्ध विचारवंत व खरगपूर येथील आयआयटीचे प्रा.डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्या हस्ते होणार आहे. दीड दिवस चालणाऱ्या परिषदेत लिंगराज आझाद(ओरिसा), सोनी सोरी(छत्तीसगड), प्रदीप प्रभू(मुंबई), अॅड. गायत्री सिंग(मुंबई), ब्रायन लोबो(डहाणू), डॉ.श्रीनिवास खांदेवाले(नागपूर), डॉ.रतिनाथ मिश्रा(नागपूर)आदी मान्यवर विविध ज्वलंत विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
२३ तारखेला रॅली काढून अभिनव लॉनवर जाहीर सभा घेण्यात येईल. या सभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या माजी खासदार वृंदा करात, भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, भारत जनआंदोलनाचे राष्ट्रीय सदस्य विजय भाई मार्गदर्शन करणार आहेत. माजी आमदार हिरामण वरखडे सभेच्या अध्यक्षस्थानी राहतील. दोन दिवसीय या परिषदेत २५ राज्यांतील प्रतिनिधी सहभागी होणार असून, सभेत काही ठराव मांडण्यात येणार आहेत. बदलत्या व्यवस्थेसंदर्भात विदयमान राज्यव्यवस्था- स्वरुप व प्रतिकार, जागतिकीकरणाच्या कचाटयात आदिवासी, दलित, श्रमिक व महिलांची स्थिती, साम्राज्यवादी व्यवस्थेत जनसंघर्षाचे भवितव्य, अधिकार, न्यायव्यवस्था तसेच जल, जंगल व जमिनीचा संघर्ष इत्यादी विषयांवर सर्वंकष चर्चा करण्यात येणार आहे. नागरिकांनी या परिषदेत मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन महेश राऊत, हिरामण वरखडे, हिरालाल येरमे, विजय लापालीकर,रोहिदास राऊत, डॉ. महेश कोपुलवार आदींनी केले आहे.