पोलिस, वनविभागाने अडविले तीन गावांतील नागरिकांना

0
12

गोंदिया,दि.२५ : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती आणि झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तातडीने सोडविण्यात यावे, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा ईशारा प्रशासनाला दिला होता. त्यासंदर्भात पंतप्रधान, मुख्यमंत्री ते वरीष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिले होते. मात्र प्रशासन आणि शासनाकडून कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले नाही. परिणामी श्रीरामपूर येथील आणि पूर्वाश्रमीचे कलवेवाडा, झंकारगोंदी आणि कालीमाती या गावांतील महिला, पुरूष आणि लहानग्यांनी आज(दि.२५) सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या गावाकडे कूच केले. परंतु यामुळे परिस्थिती चिघळून नाचक्की होईल, या हेतूने वनविभागाने पोलिस बंदोबस्त तैनात केला. जंगलात जाण्याच्या प्रवेशद्वारावर ताराचे कुंपण करण्यात आले. सुमारे तीनशे पोलिस आणि वनविभागाचे शंभरावर कर्मचारी तैनात करण्यात आले. त्या प्रकल्पग्रस्तांना जंगलात जाण्याला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे दुपारी १२ वाजताच्या सूमारास तणावाची स्थिती निर्माण झाली. प्रकल्पग्रस्तांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता तिथेच चटई टाकत बस्तान मांडले. वरीष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून आधी मागण्यांची पूर्तता करणार अन्यथा ईथून हलणार नाही, असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. तीन वाजताच्या सूमारास गोंदियाचे उपवनसंरक्षक श्री युवराज यांनी प्रकल्पग्रस्तांशी बोलणी केली. परंतु, आमच्या मागण्या पूर्ण करा, आम्ही आंदोलन करणार नसल्याचे सांगताच उपवन संरक्षकांनी देखील त्या मागण्या पूर्ण करणे आपल्या हातात नसल्याचे प्रकल्पग्रस्तांना सांगीतले. त्यामुळे उपवनसंरक्षकांना देखील हतबल होत चर्चा विफळ ठरली. कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्यामुळे सायंकाळपर्यंत प्रकल्पग्रस्त नागरीक ठाण मांडून जंगलात बसले होते. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी,पाचशे सुरक्षारक्षकांचा ताफा

श्रीरामपूरवासीयांनी टोकाची भूमिका घेत आंदोलन सुरू केले. डोळ्यासमोर निवडणुका आहेत. त्यामुळे प्रशासन आणि शासनाला देखील घाम फुटला. आंदोलन पांगविण्याकरिता गप्प बसा अन्यथा खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्याची धमकी देखील वन विभागाचे अधिकारी देत असल्याचा आरोप श्रीरामपूर येथील नागरिकांनी केला.आज सोमवारी आपण आपल्या मू‌ळ गावी परतणार असल्याचा ईशारा श्रीरामपूर येथील नागरिकांनी दिला होता. यातून प्रशासनाची नाचक्की होणार असल्याचे लक्षात येताच वनविभागाने पोलिसांचा बंदोबस्त लावला. सुमारे तीनशे पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात होते. गावात जाण्याच्या मार्गावर तारांचे कुंपन टाकून त्यांची वाट अडविण्यात आली. अधिकारी आणि गावकऱ्यांचा बाचाबाची झाल्यानंतर पोलिस लाठीचार्ज करतात की काय अशी परिस्थिती देखील निर्माण झाली होती.

मुलाबाळांसह ६०० नागरिकांचा समावेश

श्रीरामपूर येथील महिला आणि पुरूष आपल्या लहानग्या बाळांना घेवून आपल्या जंगलात असलेल्या गावाकडे निघाले होते. दिवसभर लहान मुले भूक आणि तहानेने व्याकूळ झालेले दिसून आले. मात्र निगरगट्ट झालेल्या प्रशासनाने रस्ता अडवून धरला असला तरी लहान मुलांकरिता साध्या पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही.