डॉ. खानोरकरांचे ‘मास्तर मातीचे’ प्रकाशन

0
16

ब्रम्हपूरी,दि.17ः- चिमूर क्रांतीभूमीत पार पडलेल्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध कवी, वक्ते आणि नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. धनराज खानोरकर यांच्या ‘मास्तर मातीचे’या दीर्घ कवितासंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस,अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, दिल्लीचे अशोक भारती, संमेलनाध्यक्ष प्रा. दीपक खोब्रागड यांच्या हस्ते थाटात झाले.
‘मास्तर मातीचे’काव्यसंग्रहात एकात्तर दीर्घ कविता असून, त्याला स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे प्रसिद्ध विचारवंत डॉ. केशव सखाराम देशमुखांची दीर्घ प्रस्तावना आहे. कवितासंग्रह मुंबईच्या युरो वर्ड प्रकाशनाने प्रकाशित केला असून, यातील कविता वाचनीय व शेतीमातीशी निगडीत आहेत. एकशे चौदा पृष्ठसंख्या असलेल्या या देखण्या कवितासंग्रहातील कविता अनेक दैनिकांतून, मासिकांतून, वाड्:मयीन नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या असून, अनेक मान्यवरांनी त्यांचा गौरव केलेला आहे. यातील अनेक कविता कविसंमेलनात, काव्यस्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या आहेत. डॉ. धनराज खानोरकर हे चंद्रपूर जिल्हा झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथिल मराठी अभ्यास मंडळात कार्यरत आहेत. चंद्रपूर सूर्यांश साहित्य मंडळाचे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शाखा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या या काव्यसंग्रहासाठी प्राध्यापक, लेखक, कवींनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून, सदर काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा व चर्चा २३ मार्चला ब्रह्मपुरीत होणार आहे.