पहिल्या दिवशी सहा उमेदवारांनी घेतले अर्ज

0
15

गडचिरोली,दि.19ः-आगामी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या १८ मार्च रोजी पहिल्या दिवशी सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज खरेदी केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सहापैकी एकाही उमेदवाराने सोमवारला नामांकन दाखल केलेले नाही. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. जिल्ह्यात दारूमुक्त निवडणूक पार पाडण्यासंदर्भात मागील आठवड्यात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सर्चचे डॉ. अभय बंग यांच्यासोबत बैठक पार पडली. नागरिकांनी दारूच्या प्रलोभनाला बळी पडू नये, कोणत्याही उमेदवाराकडून दारू, पैसे, वस्तुंचे प्रलोभन दाखविले जात असल्यास निवडणूक विभागास माहिती द्यावी, भयमुक्त वातावरणात निवडणुकीत मतदान करावे, विशेषत: महिलांनी मोठय़ा प्रमाणात मतदानासाठी समोर यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
निवडणुकी संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी १९५0 हा टोल फ्री क्रमांक असून या क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तसेच निवडणूक आयोगाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अँपव्दारे नागरिकांना तक्रार नोंदविता येईल. संबंधितांना प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी सिंह म्हणाले. जिल्ह्यात आचारसंहितेचे पालन केले जात आहे. प्रसिध्दीचे बॅनर, भूमिपुजन, लोकार्पणाचे फलक, जाहीरातीचे फलक काढण्यात आलेले आहेत.
निवडणुकीच्या कामासाठी गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ७00 कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. यावर्षी प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर होत असल्याने २५-२५ कर्मचार्‍यांचे गट करून प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यातील अपंग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाणे सोपे व्हावे, याकरीता ३00 ग्रामपंचायतींना व्हिलचेअर पुरविण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रापर्यंत अपंगांना पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गरोदर महिला मतदारांसाठीसुध्दा विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सिंह यांनी दिली. निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे. रॅली, दिंडी, पथनाट्य, रांगोळी आदींच्या माध्यमातून प्रसिध्दी केली जात आहे, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.