‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’तर्फे डॉ. वानखेडे सन्मानित

0
17

गोंदिया ,दि.19ःःजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत डॉ. विजय वानखेडे यांनी जिल्ह्याच्या गौरवात आणखी एक भर पाडली आहे. डॉ. विजय वानखेडे हे सन २0१६-१७ या आर्थिक वर्षात देशात सर्वात जास्त पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया करणार्‍या शल्यचिकित्सकांच्या यादीत आले आहेत. त्यामुळे डॉ. विजय वानखेडे यांचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे १५ मार्च रोजी भोपाळ येथे सन्मान करण्यात आला.
डॉ. विजय वानखेडे हे सन १९७८ मध्ये बीएएमएस झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झाले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत सन २00७-0८ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारासाठी निवड झाली. त्यातच शासकीय सेवेत अतिउत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांना दोन आगाऊ वेतनवाढही शासनाकडून मिळाली. सन १९९९ ते आजपर्यत डॉ. विजय वानखेडे यांनी १८ हजार ४५0 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या व ५ हजार २५८ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली. त्यात सन २0१५-१६ या आर्थिक वर्षात ५६0 पुरूष नसबंदी, सन २0१६-१७ या आर्थिक वर्षात ८९२ पुरूष नसबंदी, सन २0१७-१८ या आर्थिक वर्षात ८५२ पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया केली. सतत तीन वर्ष सर्वात जास्त पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय अधिकारी म्हणून ते राज्यात अव्वल ठरले. याबद्दल दिल्ली येथे आरोग्य विभागातर्फे त्यांना सन्मानितही करण्यात आले होते. सन २0१६-१७ या आर्थिक वर्षात ८९७ नसबंदी शस्त्रक्रिया म्हणजेच देशातही सर्वाधिक शस्त्रक्रिया करणारे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. विजय वानखेडे हे ठरले. त्यामुळे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉड’तर्फे १५ मार्च रोजी भोपाळ येथे डॉ. विजय वानखेडे यांना सन्मानित करण्यात आले.