ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

0
13

वाशिम, दि. 20 :  राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या सर्व ग्रामपंचायातींसाठी २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत मतदान होणार आहे. मतदान होत असलेल्या सर्व ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रांवर २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेशानुसार २३ मार्च २०१९ रोजी रात्री १० वा. नंतर राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाही. धार्मिक स्थळांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपयोग करता येणार नाही. आचारसंहितेच्या संपूर्ण काळात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. सभेदरम्यान, मतदानादिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी १०० मीटर परिसरात निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त कोणताही व्यक्ती प्रवेश करणार नाही. राजकीय व कोणत्याही नागरिकांचे हनन होणार नाही. ईव्हीएम मशीन गार्डपासून १०० मीटर परिसरात निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्ती प्रवेश करणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम तालुक्यातील एकांबा, अडगाव खु., देवठाणा बु., जांभरुण नावजी, वांगी, सोयता, रिसोड तालुक्यातील भरजहांगीर, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, खडकी इजारा, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना, मंगरूळपीर तालुक्यातील मंगळसा, लाठी, चिखली, तपोवन,बिटोडा, इचोरी, मानोरा तालुक्यातील बोरव्हा, चौसाळा, दापुरा बु. दापुरा खु., ढोणी, फुलउमरी, गिरोली, जामदरा घोटी, काली, कोलार, पाळोदी, सोमेश्वरनगर, उमरी बु., उमरी खु. या ३२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तसेच जिल्ह्यातील ६ ग्रामपंचातींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील गोंडेगाव, रिसोड तालुक्यातील घोन्सर, मोरगव्हाण, मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी, मानोरा तालुक्यातील खांबाळा, कारंजा तालुक्यातील झोडगा बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.