महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जिल्ह्यातून ४६३२ परीक्षार्थी

0
22
  • चौदा उपकेंद्रांवर होणार परीक्षा

वाशिम, दि. २० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९ रविवार, २४ मार्च २०१९ रोजी चौदा परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १० वा. ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. चौदाही परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातून ४६३२ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.

राजस्थान महाविद्यालय, माउंट कारमेल हायस्कूल,  श्री शिवाजी हायस्कूल, श्री तुळशीराम जाधव महाविद्यालय, सन्मती इंजिनिअरींग कॉलेज, हॅपी फेसेस हायस्कूल-१, हॅपी फेसेस हायस्कूल-२, एसएमसी इंग्लिश स्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, श्री बाकलीवाल विद्यालय, श्री. बालाजी अध्यापक महाविद्यालय, शासकीय तंत्र निकेतन, रेखाताई राष्ट्रीय कन्या शाळा व जवाहर नवोदय विद्यालय या चौदा उपकेंद्रांवर ही परीक्षा होत आहे.

परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र परीक्षार्थींनी स्वतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेस येताना प्रवेशपत्रासोबतच स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना (फक्त स्मार्टकार्ड प्रकारचा) यापैकी कोणतेही दोन मूळ ओळखपत्र व त्याची एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी व ती स्वतःच्या स्वाक्षरीसह (सेल्फ अटेस्टेड) समवेक्षकाकडे जमा करणे अनिवार्य आहे. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व उमेदवारास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल.

आधारकार्ड ऐवजी भारतीय विशिष्ट् ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करण्याऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई-आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्म तारीख या तपशिलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date Of Adhaar generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह कलर प्रिंटमध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.

स्मार्ट वॉच, डिजीटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिम कार्ड, ब्ल्यू टूथ, दूरसंचार साधने म्हणुन वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू, इलेक्ट्रानिक उपकरणे, वह्या, नोटस, परवानगी‍ नसलेली पुस्तके, बॅग्ज, पॅड, पाऊच, परिगणक इत्यादी प्रकारची साधने / साहित्य परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वत:जवळ बाळगण्यास त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. आयोगाने परवानगी नाकारलेले कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत साधन / साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन/साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस आयोग, जिल्हा प्रशासन किंवा शाळा महाविद्यालय व्यवस्थापन जबाबदार राहणार नाहीत. फक्त पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीच्या पुराव्यासाठी वैध मूळ ओळखपत्र अथवा प्रवेश प्रमाणपत्रातील सुचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल.

अर्जात हेतुपुरस्सर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवुन ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आयोगास सादर केलेल्या पुरावा/कागदपत्रामध्ये अनधिकृत पणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले वा बनावट पुरावा, दाखले सादर करणे, आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणे, परीक्षा कक्षातील गैरवर्तन, परीक्षेच्या वेळी नक्कल करणे, वशीला लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे अथवा परीक्षा कक्षाच्या बाहेर अथवा परीक्षेनंतरही तसेच अन्य कोणतेही गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे, विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना वा निवडींना अनर्ह ठरविणे, काळ्या यादीत समाविष्ट करणे व प्रतिरो‍धित करणे (Debar) यापैकी प्रकरण परत्वे आयोगाच्या स्वेच्छा‍धिकारानुसार योग्य त्या शिक्षेला संबंधित व्यक्ती पात्र ठरेल. तसेच प्रचलित कायदा व नियमांच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्यात येईल, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.