राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६०६ प्रकरणे निकाली

0
13

वाशिम, दि. २० : जिल्हा न्यायालयात १७ मार्च २०१९ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांच्या हस्ते राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे यांच्यासह जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस. डी. मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, न्यायिक अधिकारी एस. बी. पराते, श्रीमती डॉ. रचना आर. तेहरा, एस. पी. शिंदे, श्रीमती स्वाती फुलबांधे, पी. एस. नेरकर, श्रीमती डॉ. यु. टी. मुसळे, श्रीमती के. बी. गीते, एम. एस. पौळ, एस. बी. बुंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एकाच दिवसात ६०६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

यावेळी बोलताना श्री. जटाळे म्हणाले, राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने मिटवावेत. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाल्यास त्याचा पक्षकारांना फायदा होतो व त्यांचे आपसी संबंध टिकवून ठेवता येतात.

अपर जिल्हाधिकारी श्री. वानखडे व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष श्री. मोरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वाशिम जिल्ह्यात न्यायालयात प्रलंबित असलेली ४२१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच दाखलपूर्व १८५ प्रकरणांचा निपटारा यावेळी करण्यात आल्याचे जिल्हा विधी प्राधिकरणमार्फत कळविण्यात आले आहे. सुरुवातील जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव आर. आर. विश्वकर्मा यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती गीतांजली गवळी यांनी केले.