बीआरएसपी’च्या मानेंनी नागपूरात भरला अर्ज,रामटेकमधून दोन अर्ज

0
15

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नागपूर मतदार संघातून नऊ उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले. रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये अब्दुल करीम अब्दुल गफार पटेल (केआयआर) एआयएमआयएम, उल्हास शालिकराम दुपारे(अपक्ष) व दीपक लक्ष्मणराव मस्के (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.नागपूरात मनोज बावणे : अपक्ष,प्रभाकर सातपैशे : अपक्ष,ॲड. विजया बागडे : आंबेडकर राइट्स पार्टी ऑफ इंडिया,रुबेन डॉमिनिक फ्रान्सिस : अपक्ष,कार्तिक डोके : अपक्ष,वनिता राऊत : अखिल भारतीय मानवता पक्ष,खुशबू बेलेकर : बळीराजा पार्टी,योगेश आकरे : सीपीआय (एम) रेड स्टार यांनीही अर्ज सादर केले आहेत.

तत्पूर्वी विदर्भ  निर्माण महामंचतर्फे दीक्षाभूमी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करून रॅली काढण्यात आली. संविधान चौकात ही रॅली पोहोचली. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना अ‍ॅड. सुरेश माने म्हणाले की, ही निवडणूक प्रस्थापितांना सोपी जाणार नाही. नितीन गडकरी विकासाच्या गोष्टी करतात परंतु नागपूर शहरात अजूनही अनेक वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होतो. यालाच विकास म्हणत असाल तर नागरिक माफ करणार नाही. विकासाच्या मुद्यावर गडकरी यांना आपण रोज पाच प्रश्न विचारणारआहोत. नाना पटोले हे भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्याने ते पवित्र झाले असे नाही. जनता त्यांनाही माफ करणार नाही. विदर्भवादी उमेदवार म्हणून आपल्याला जनता भरभरून मतदान करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांच्यासोबत अ‍ॅड. वामनराव चटप, राजेश बोरकर, ज्ञानेश वाकुडकर,रमेश पिसे आदी उपस्थित होते.चौथा शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. सोमवारी अखेरचा दिवस असल्याने या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांसह अर्ज भरण्याची गर्दी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.