इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडियासाठीच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक-जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
19
  • माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती सभा

वाशिम, दि. २६ : लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी चित्रपटगृह, बल्क एस.एम.एस, व्हाईस मेसेज, दूरचित्रवाणी, केबल नेटवर्क, सोशल मिडिया, रेडिओ तसेच सार्वजनिक ठिकाणी डिजीटल बोर्डवर प्रसारित करावयाच्या जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरीय माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीद्वारे या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हृषीकेश मोडक यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या जिल्हास्तरीय माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, समितीचे सदस्य तथा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ आणि अकोला लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय गोगटे, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनुप खांडे, प्रा. गजानन वाघ, प्रा. मंगेश हुले, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी तानाजी घोलप उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकिय पक्ष किंवा उमेदवाराकडून इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडियाद्वारे तसेच सार्वजनिक ठिकाणी दृकश्राव्य स्वरुपात प्रसारित होणाऱ्या जाहिरातींचे पूर्व-प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. याकरिता जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. मतदानाच्या ४८ तास अगोदर मुद्रितमाध्यमांतून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरातींचा मजकुराचे सुद्धा या समितीकडून पूर्व प्रमाणीकरण करून घ्यावे लागणार आहे. निवडणूक कालावधीत प्रसिद्ध होणाऱ्या पेड न्यूजवर ही समिती आवश्यक कार्यवाही करणार आहे. समितीमार्फत सोशल मिडियातील जाहिरातींवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

जाहिरात प्रमाणीकरणासाठी असा करा अर्ज

जाहिरातींचे प्रमाणिकरण करण्यासाठी राष्ट्रीयकृत पक्षाच्या उमेदवारांनी जाहिरात प्रसारीत करण्याच्या तीन दिवस अगोदर सदर जाहिरातीची सी. डी. आणि संहिता (स्क्रिप्ट) दोन प्रतीत विहित नमुन्यातील अर्जासोबत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांनी जाहिराती प्रमाणित करण्यासाठी द्यावयाचा अर्ज जाहिरात प्रसारणार दिवसाच्या सात दिवस अगोदर द्यावा. अर्जासोबत जाहिरात तयार करण्यासाठी केलेला खर्च आणि जाहिराती प्रसारणासाठी येणाऱ्या खर्चाचा तपशिल विहित अर्जात देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर मुद्रित माध्यमासाठी मतदानापूर्वी शेवटच्या ४८ तासात देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करुन घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्ष क्र. २०२, दुसरा माळा येथील जिल्हा माहिती कार्यालयातील प्रसारमाध्यमे कक्षामध्ये जाहिरात प्रमाणीकरणसाठी अर्ज स्वीकारले जातील.