अपघातांची कारणे शोधून आवश्यक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
18
  • जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची सभा

वाशिम, दि. २६ : अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अपघातांचे कारणे शोधणे आवश्यक आहे. कोणत्या कारणांमुळे होणारे अपघात जास्त आहेत, याचा शोध घेवून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या सभेत ते बोलत होते.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, सहाय्यक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. हरण, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, वाहतूक पोलीस शाखा व महामार्ग पोलीस शाखेचे अधिकारी व इतर सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांची कारणे लक्षात येण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत एक अपघातांचे शास्त्रोक्त विश्लेषण करणारी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, एक मोटार वाहन निरीक्षक व एक सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांचा समावेश राहणार आहे. यापुढे ज्या अपघातामुळे मृत्यू होईल अथवा कोणी गंभीर जखमी होईल, अशा अपघातांमध्ये ही समिती अपघातस्थळाला भेट तत्काळ देवून अपघातास वाहनचालक, वाहनाची यांत्रिक स्थिती, रस्त्याची तांत्रिक व भौगोलिक स्थिती अथवा इतर कोणते कारण जबाबदार आहे, याचे विश्लेषण करून याबाबतचा अहवाल जिल्हा सुरक्षा समितीला सादर करणार आहे. त्यामुळे अपघातांचे नेमके कारण लक्षात घेवून त्यावर उपाययोजना करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणारी वाहनांकडून वाहतूक नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. याकरिता उप प्रादेशिक परिवहन विभागाने सर्व मुख्यापाकांची कार्यशाळा घेवून त्यांना आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच शाळा, महाविद्यालयस्तरावरील परिवहन समितीमार्फत वाहतूक नियमाच्या पालनासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.