भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटला-खा.प्रफुल पटेल

0
18

भंडारा,दि.29 : देशात गत पाच वर्षाच्या काळात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कृषी विषयक धोरण पार कोलमडून पडले आहे. भंडारा – गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. पाच वर्षात एकही मोठा उद्योग सरकार आणू शकले नाही. जिल्ह्यात विकासाची गंगा आणायची असेल तर युपीए सरकारशिवाय पर्याय नाही असे विचार खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले.ते भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ भंडारा तालुक्यातील शहापूर, परसोडी, बेला, वरठी, मोहाडी, आंधळगाव, जांब, कांद्री आणि भंडारा शहरातील विविध ठिकाणी आयोजित सभेत ते बोलत होते.

सभेला उमेदवार नाना पंचबुद्धे, आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार आनंदराव वंजारी, जिया पटेल, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकपूर राऊत, दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी,स भापती प्रेमदास वनवे, अ‍ॅड.किशोर लांजेवार, दीनदयाल देशभ्रतार, नंदू झंझाड, नरेश डहारे, शिशीर वंजारी, जया सोनकुसरे, पूजा ठवकर, भाऊ कातोरे, नरेंद्र झंझाड, नरेंद्र बुरडे, मनीष वासनिक, डॉ.रवींद्र वानखेडे उपस्थित होते.
पटेल म्हणाले की, आम्ही जिल्ह्याचा विकास केला. येथे एक आयुध निर्माणी कारखाना सुरु करण्यात आला. खासदार असताना दोन मोठे कारखाने आणले. एमआयडीसी निर्माण केली. शेतकऱ्यांच्या धानाला हमीभाव दिला. मात्र या सरकारने सर्वच आघाड्यांवर जनतेची फसवणूक केली. येत्या निवडणुकीत आम्हाला निवडून दिल्यास शेतकऱ्यांच्या धानाला ३२०० रुपये भाव व बोनस हमखास देऊ, गरीब कुटुंबांना प्रती माह ६ हजार रुपये देण्याचा आमचा वचननामा आहे. विकासाची गंगोत्री आणण्यासाठी युपीएची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
परसोडी येथील सभेचे प्रास्ताविक दीनदयाल देशभ्रतार यांनी, संचालन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध शामकुवर यांनी केले. खासदार पटेल म्हणाले, गेल्या निवडणुकीत मोदी सरकारने अनेक आश्वासने दिले होती. अच्छे दिनचे स्वप्न दाखविले होते. पेट्रोल डिझेलचे भाव वाढत असून नोटबंदीमुळे रोजगार कमी झाले आहेत. शेतकरीही समस्याग्रस्त झाले असून त्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. त्यामुळे या सरकारला जनताच आता कंटाळली आहे, असे त्यांनी सांगितले.