लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३२७७ शाईच्या बाटल्या

0
14
  • प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय वितरण

वाशिम, दि. ३१ :  मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य नागरिक असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य असा घटक बनली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी जिल्ह्याला ३२७७ शाईच्या बाटल्या प्राप्त झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकांकरिता जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांमध्ये ९ लक्ष ३४ हजार ५४९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत ३ हजार २७७ शाईच्या बाटल्या जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. यापैकी रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी ८००,वाशिम विधानसभा मतदारसंघासाठी ९१० व कारंजा विधानसभा मतदारसंघासाठी ८८० अशा एकूण २५९० शाईच्या बाटल्यांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण करण्यात आले आहे. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई  म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.

जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांमध्ये १०४३ मतदान केंद्र असून २१ सहाय्यकारी मतदान केंद्रांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो.मतदानापूर्वी मतदान अधिकारी (पोलिंग ऑफिसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली नाही, याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करू देत नाही, त्या व्यक्तीला मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.