गोसेबाधितांचा बहिष्कार कायम!

0
16

भंडारा,दि.07ः-लोकसभा निवडणुकीवर प्रहार गोसेखुर्दप्रकल्प संघर्ष समितीने बहिष्कार कायम ठेवला असून आ. बच्चू कडू यांचे निर्देश मिळेपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
गोसेबाधितांनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात लोकशाही मार्गाने अनेक ऐतिहासिक आंदोलने केली. परंतु, सरकारने सकारात्मकता दाखवून भुलथापा दिल्या. परिणामी, आगामी २0१९ च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार भंडारा- गोंदिया आणि रामटेक लोकसभा क्षेत्राच्या २ लाख प्रकल्पग्रस्त मतदारांचा राहणार आहे. याबाबतचे निवेदन दि. २५ मार्चला मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविण्यात आले. निवेदनाची दखल घेत अनेक बड्या पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी बहिष्कार घेऊ नका सत्तेत आल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या संपूर्ण समस्या सोडवू, असे आश्‍वासन दिले. तर दि. ३0 मार्चला विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी प्रहार गोसेखुर्द संघर्षसमिती, महसूल आणि जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक घेऊन महाराष्ट्र शासन बाधितांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच जलसंपदा विभागामार्फत कार्यकारी अभियंता वि. के. बुराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी समितीला पत्र देऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, समितीचे बच्चू कडू यांचे निर्देश मिळेपर्यंत बहिष्कार कायम असल्याचे कळविले आहे. तसेच ८ मार्चपर्यंत बच्चू कडू बहिष्काराबाबत निर्देश देतील, असे संकेत समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिले. त्यानंतरच योग्य पाऊल उचलण्यात येणार आहेत.