1 लाख 92 हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन;45 हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

0
24

भंडारा, दि. 23:- खरीप हंगाम 2019-20 साठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. या हंगामात पावसाची चांगली सरासरी हवामान खात्याने वर्तविली आहे. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी 1 लाख 92 हजार 650 हेक्टर खरीपाचे नियोजन केले आहे. खरीप हंगाम 2018-19 साठी 44 हजार 954 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. तर जिल्हयाला खतांचे 86 हजार 100 क्विंटल आवंटन प्राप्त झाले आहे. पावसाचा अंदाज चांगला असल्याने कृषी विभागाने खरीपाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केल्या. जिल्हयातील अल्पभूधारक तसेच अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची माहिती तात्काळ गोळा करुन त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्याचे नियोजन कृषी विभागाने करावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रत्नाकर खांडेकर, कृषी विकास अ धिकारी संतोष डाबरे व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पिक कर्ज वाटप, पीएम किसान योजना, जलयुक्त शिवार, कर्ज वाटप यासह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. जिल्हयात 2 लाख 3 हजार 639 हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे, तर 46 हजार 610 हेक्टर रब्बी क्षेत्र आहे. सन 2018-19 मध्ये जिल्हयात 74.61 मि.मी. पावसाची टक्केवारी होती.
खरीप हंगाम 2019 साठी 1 लाख 92 हजार 650 हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. यात खरीप भात 1 लाख 80 हजार हेक्टर, तूर 12 हजार 100 हेक्टर व सोयाबीन 550 हेक्टर आहे. या वर्षी 44 हजार 954 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यात भात पिकासाठी -43 हजार 739 क्विंटल, तूर- 865 क्विंटल व सोयाबीन-350 क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी रासायनिक खताचे नियोजन करण्यात आले आहे. यात युरिया-38 हजार 740 क्विंटल, डीएपी-10 हजार 630 क्विंटल, एसएसपी-11 हजार 310 क्विंटल, एमओपी- 2 हजार 980 क्विंटल व इतर संयुक्त खते 23 हजार 440 क्विंटल असे एकूण 86 हजार 100 क्विंटलचे आवंटन आहे.
2019 च्या खरीप हंगामासाठी पिक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. 98 हजार 260 सभासदांना 414 कोटी 50 लाख रुपयाच्या कर्ज वाटपाचे नियोजन आहे. 2018-19 मध्ये 69 हजार 424 सभासदांना 334 कोटी 76 लाखाचे पिक कर्ज वाटप करण्यात आले होते. यात राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक व जिल्हा सहकारी बँकेचा समावेश आहे. खरीप हंगाम 2018 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत 67 धान खरेदी केंद्रावर 47 हजार 473 शेतकऱ्यांकडून 15 लाख 20 हजार 610 क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यासाठी 266 कोटी 10 लाख रुपयांचे चुकारे देण्यात आले.
खरीप हंगाम 2019-20 साठी बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके तक्रार निवारण करण्याकरीता 18002334000 हा टोल फ्रि क्रमांक व 07184-252464, 07184-252393 हे दुरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अधिक माहिती करीता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी तथा पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.