गडचिरोलीत हिवतापावर नियंत्रण मिळविण्यात हिवताप विभागाला यश

0
56

गडचिरोली,दि.२४: व्यापक जनजागृती व प्रभावी उपाययोजना यामुळे हिवताप आटोक्यात आणण्यात हिवताप विभागाला यश आले आहे. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील हिवतापाच्या रुग्णसंख्येत प्रचंड घट झाली आहे.२०१७-१८ ते मार्च २०१९ या सव्वा दोन वर्षात हिवतापामुळे ९ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये ५ जण हिवतापामुळे दगावले. २०१८ मध्ये ३ व २०१९ च्या जानेवारी महिन्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. यापूर्वीच्या काही वर्षांच्या तुलनेत हिवतापामुळे रुग्ण दगावण्याचे प्रकार कमी करण्यात आलेले हे यश आहे, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

२०१७ मध्ये ५ लाख ९८ हजार १६७ लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले. त्यापैकी ५ हजार ४८४ रुग्ण हिवतापाने बाधित आढळून आले. २०१८ मध्ये ५ लाख ५९ हजार ५८४ जणांचे रक्त नमुने तपासण्यात आले. त्यापैकी २ हजार ५८४ रुग्ण हिवतापाने बाधित आढळले. २०१९ च्या मार्चपर्यंत १ लाख १२ हजार ४९१ रक्त नमुने घेण्यात आले. त्यापैकी २१० रुग्णांचा हिवतापाची बाधा झाल्याचे दिसून आले, असे डॉ.मोडक यांनी सांगितले.यंदा जून महिन्यात १ हजार ३१५ गावांत डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत ७२ हजार मच्छरदाण्या वितरीत करण्यात आल्या आहेत, असेही डॉ.मोडक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संजय समर्थ उपस्थित होते.