शास.वैद्यकिय महाविद्यालयात मुदतबाह्य औषधांचा वापर,प्रशासनाचे मौन

0
18

गोंदिया,दि.24(खेमेंद्र कटरे)ः- येथील कुवरतिलक सिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते.त्यातच आज पुन्हा बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक लोकेश यादव यांच्या रुग्णालय भेटीदरम्यान रुग्णालयातील भोंगळ कारभार चांगलाच चव्हाट्यावर आल्याने जिल्हाप्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या आरोग्य सेवा चांगली देण्याच्या गोलगप्पांचा पोळाच फुटला असे म्हणण्याची वेळ आली आहे.पालकमंत्री,खासदार,आमदार असो की जिल्हाधिकारी ,सीईओ हे फक्त देखाव्यासाठीच रुग्णालयाला फेरफटका मारुन आमचे लक्ष असल्याच्या देखावा करीत असल्याचे रुग्णालयात आढळलेल्या मुदतबाह्य औषधांवरुन समोर आले आहे.

रुग्णांच्या उपचारासाठी असलेले यंत्रसामग्री बंद स्थितीत आढळून आली तर रुग्णांना मुदतबाह्य औषधांचा पुरवठा केला जात असल्याचे नगरसेवक लोकेश यादव यांच्या निदर्शनास आज(दि.24) सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास रुग्णालयात दाखल रुग्णांची भेट घेण्याकरीता गेले असता त्यांच्यासमोर ही परिस्थिती आढळून आली.नगरसेवक यादव यांच्या प्रभागातील रुग्ण व विषप्राशन केलेल्या एका युवकाला बघण्यासाठी गेले असता त्या युवकाला लावलेले व्हेंटीलेटर बघितले असता ते बंद आढळून आले.तेव्हा रुग्णालयातील आयसीयु मध्ये असलेल्या दोन पैकी 1 व्हेंटीलेटर गेल्या पाच महिन्यापासून बंद असल्याचे परिचारिकांनी सांगितले.तर औषध भांडारात 2014 व 2018 मध्ये मुदतसंपलेले इंजेक्शन आढळून आल्याचे यादव यांनी सांगितले.महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत क्षयरुग्णासह इतर रुग्णासाठी रक्त व कप तपासणीकरीता असलेली मशीन सुध्दा गेल्या 1 वर्षापासून बंद आहे.रुग्णाच्या बेडवरील चादर बदलविण्यासंदर्भात आयसीयुकक्ष प्रभारी भुरे यांना बोलले असता आतमध्ये असलेले क्षयरोग तपासणी मशीन बंद अवस्थेत आढळून आल्याचे यादव यांनी सांगितले.त्याचवेळी मोठ्या ट्रेमध्ये असलेल्या पॅकेटकडे लक्ष दिले असता त्या पॅकेटमध्ये अल्ट्रा पालिमेट स्टेरिलि व मेडीयन इंजेक्शन ज्याची मुदत मार्च 2018 होती ते सुध्दा आढळून आले.तसेच जेन्टोरेन नामक इंजेक्शनचे दोन बाॅक्स आढळले ज्याची मुदत आक्टोंबर 2018 मध्येच संपलेली होती.

दरम्यान या सर्व प्रकरणाबाबत शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.व्ही.पी. रुखमोडे यांना विचारणा केली असता आपल्याकडे लेखी तक्रार कुणीही यांसदर्भात केलेली नाही.औषध भांडारात मुदतबाह्य औषधी व इंजेक्शन असल्याचे कुणी दाखविले यासंदर्भात माहिती नाही आणि मुदतबाह्य औषध असल्याचे आपणाकडे अद्यापही कुणी सांगितलेले नाही,त्यामुळे कारवाई कुणावरही विनाकारण करता येणे शक्य नाही.परंतु कुणी जर लेखी तक्रार देत असतील तर त्यावर नक्कीच चौकशी समिती बसवून चौकशी केली जाईल अशी माहिती बेरार टाईम्सला दिली.

नगरसेवक लोकेश यादव तसेच बसप कार्यकर्ता अशोक आरखेल हे आज रुग्णालय परिसरात रुग्णांची पाहणी व विचारपुस करण्याकरीता गेले असता रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार औषधे मिळत नसल्याचे लक्षात आले.सोबतच अती दक्षता कक्षात(आयसीयु)मधील लाईफ सपोर्ट सिस्टम,डायलिसिस मशीन,रक्त तपासणी यंत्रासारखे अनेक साहित्य बंद अवस्थेत असल्याचे आढळून आले.सोबतच औषधांचा पुरवठा सुध्दा नसल्याचे औषध कक्षातील कर्मचार्यांनी सांगितले.त्याचवेळी औषध भांडार कक्षात एक वर्षापुर्वीच मुदत सपंलेले इंजेक्शन व काहीऔषधांचा पुरवठा रुग्णांना केला जात असल्याचे समोर येताच नगरसेवक यादव यांनी रुग्णालयाचे अधिष्ठातांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या भेटीकरीता गेले.मात्र 11 वाजेची वेळ लोटूनही अधिष्ठाता हे आपल्या रुग्णालयातील कक्षात नसल्याचे यादव यांना कळताच त्यांनी रुग्णालयाप्रती व रुग्णाप्रती शासन प्रशासन असहाकार्याची भूमिका घेत असल्याबद्दल प्रशासनाचा धिक्कार नोंदविला.त्याठिकाणी हजर असलेले वैद्यकिय अधिकारी डाॅ.नंदकिशोर जायस्वाल यांना यासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही बाजू झटकत मी सर्व माहिती अधिष्ठातांना दिली असल्याचे सांगत गप्प राहिले.