साहित्य महामंडळावर विदर्भाचे तीन प्रतिनिधी

0
18

नागपूर,दि.29 : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीमध्ये विदर्भ साहित्य संघाचे प्रतिनिधी म्हणून विलास मानेकर, अकोल्याचे डॉ. गजानन नारे आणि वर्धा येथील प्रदीप दाते यांची नियुक्ती क रण्यात आली आहे. रविवारी वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
वि.सा. संघाच्या रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नव्या प्रतिनिधींची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी साहित्य संघाच्या विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. साहित्य महामंडळाचा विदर्भातील तीन वर्षाचा कार्यकाळ ३१ मार्चला पूर्ण झाला. सोबत महामंडळावर असलेल्या विदर्भाच्या पूर्वीच्या प्रतिनिधींचा कार्यकाळही संपला आहे.
१ एप्रिलपासून महामंडळाचे कार्यालय औरंगाबाद येथे मराठवाड्याच्या संस्थेकडे राहणार आहे. याबाबत माहिती देताना म्हैसाळकर यांनी सांगितले की, या तीन पदाधिकाऱ्यांची निवड यापूर्वीच करण्यात आली होती. रविवारी झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महामंडळातर्फे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनापासून महामंडळाच्या बैठका, धोरणात्मक निर्णय आणि विविध उपक्रमांमध्ये विदर्भ संघाची भूमिका मांडण्यात या तीन प्रतिनिधींची महत्त्वाची जबाबदारी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विलास मानेकर हे सध्या वि.सा. संघाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी पाच वर्षे कोषाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे. साहित्य संघाच्या विविध कार्यात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.