माहुरकुडावासीयांना एक वर्षापासून सरपंचाची प्रतीक्षा

0
46

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.11ः- तालुक्यातील माहुरकुडा ग्रामपंचायत १२ महिन्यापासून सरपंचाविना पोरकी झाली आहे. प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच कल्पना मेश्राम कार्यभार बघत आहेत. गाव विकासाकरिता महत्वाचे पद रिक्त असतना फेरनिवडणूक घ्यायला निवडणूक विभागाला वेळ का  मिळत नाही काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
राजेंद्र कोडापे हे राखीव प्रवगार्तून सरपंच झाले होते. सरपंचपदी आरुढ होताच कोडापे यांच्याकडून ग्रामपंचायत कार्यालयात मद्यप्राशन करुन येणे, ग्रामसभेत दारु पिऊन येणे असे प्रकार घडल्याने उपसरपंच व सदस्यांनी त्यांच्यावर अविश्‍वास आणला. १४ जून २0१८ रोजी प्रस्ताव संमतही झाला. सरपंचपद रिक्त झाल्याने या पदाचा प्रभार उपसरपंच कल्पना मेश्राम यांच्याकडे सोपविण्यात आला. प्रभार सोपवण्याला जवळपास १२ महिन्याचा कालावधी लोटत असूनही अद्यापही निवडणूक विभागाने फेरनिवडणूक घेतली नाही. ग्रामपंचायत अधिनियमान्वये रिक्तपदाची निवड ६ महिन्याच्या आत होणे बंधनकारक आहे. असे असतानाही अद्याप निवडणूक विभागाने हे रिक्त पद भरण्यासाठी निवडणूक घेतलीच नाही. त्यामुळे प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच कारभार पाहत आहे. परिणामी माहुरकुडा ग्रामपंचायत सरपंचाविना पोरकी म्हणण्याची वेळ आली आहे.
यासंदर्भात तहसिलदार विनोद मेश्राम यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, गटविकास अधिकार्‍याकडून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे व आवश्यक असल्यास त्यांच्याकडून जिल्हाधिकार्‍यांकडे रिक्त सरपंच पदाची निवडणूक घेण्याचा प्रस्ताव जाईल. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये रिक्त सरपंच पदाची निवडणूक घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.