शेततळ्यात बुडून चुलत भावंडांचा मृत्यू

0
18

गडचिरोली,दि.१८ – विटभट्टीवरील राख आणण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा शेततलावासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोदली शेतशिवारात घडली. मुन्ना मनोहर मेश्राम (१३) व किसन जगदिश मेश्राम (१३) दोन्ही रा. बोदली अशी मृतक भावडांची नावे आहेत.

माहितीनुसार मुन्ना व किसन हे चुलत भाऊ सकाळी सायकलने गावाजवळील विटभट्टीवर राख आणण्यासाठी गेले होते. राख जमा केल्यानंतर दोघेही सायकलने गावाकडे परत येत होते. दरम्यान विठोबा वासेकर यांच्या शेतात शेततळ्यासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ ते पोहोचले. मात्र अचानक मुन्नाचे संतुलन बिघडल्याने तो पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला. मुन्नाला वाचविण्यासाठी किसननेसुध्दा खड्ड्यात उडी मारली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दुपारपर्यंत दोन्ही भाऊ घरी परत न आल्याने दोघांना शोधण्यासाठी कुटुंबिय विटभट्टीकडे जाण्यास निघाले. दरम्यान कुटुंबियांना शेतातील खड्ड्याजवळ त्यांची सायकल आढळून आली. कुटुंबियांना संशय येताच, त्यांनी खड्ड्यातील पाण्यात शोध घेतला. यावेळी दोघांचेही मृतदेह खड्ड्यातील पाण्यात आढळून आले.
घटनेची माहिती वाºयासारखी बोदली गावात पोहोचताच बोदली व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या सहाय्याने दोन्ही भावांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. घटनेसंदर्भात गडचिरोली पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.
चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.