प्रबोधनात्मक लिखाण करणाऱ्या बातमीदारांना पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

0
27

 गडचिरोली, दि.29 : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम प्रभावी व यशस्वीपणे राबविण्यासाठी पूरक व प्रबोधनात्मक लिखाण  करणाऱ्या बातमीदारांना पुरस्कार घोषीत करण्यात येतात. यासाठी 15 जुन 2019 पर्यंत विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांचेतर्फे करण्यात येत आहे.

राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम 2007 पासून सुरु करण्यात आली .  या मोहिमेची व्याप्ती व महत्व लक्षात घेता ही लोकसहभागाची चळवळ होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले आहे.  त्याचाच एक भाग म्हणून सकारात्मक पत्रकारीतेचा विचार प्रसारमाध्यमांनी जनसामान्यापर्यंत यशस्वीरित्या पोहचविण्यासाठी वृत्तपत्रांच्या बातमीदारांना पुरस्कार देण्यात येतात. त्यानुसार जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार 25 हजार, व्दितीय पुरस्कार 15 हजार, तृतीय पुरस्कार 10 हजार. विभागस्तरावर प्रथम पुरस्कार 1 लाख, व्दितीय पुरस्कार 75 हजार, तृतीय पुरस्कार 50 हजार. राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार 2 लाख 50 हजार, व्दितीय पुरस्कर 1 लाख 50 हजार तर तृतीय पुरस्कार 1 लाख रुपये आहे. 2 मे 2018 ते 1 मे 2019  या कालावधीत प्रसिध्द केलेले या संदर्भातील साहित्य पुरस्कार पात्रतेकरीता मुल्यमापनार्थ ग्राहय धरण्यात येईल.

            पुरस्कारासाठी या कालावधीत वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टीकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटो फिचर अशा साहित्याचा विचार करण्यात येतो. पुरस्कारासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभ लेखक, मुक्त पत्रकार पात्र असतील. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द झालेले साहित्य पुरस्कारासाठी पात्र राहील. ज्या स्तरावरील पारितोषिकेसाठी अर्ज करावयाचा आहे,  त्यास्तरावरील समितीच्या सदस्य सचिवांकडे अर्ज करता येईल. मात्र कोणत्याही एक पारितोषिकेसाठी अर्ज करता येईल. विहीत मुदतीत वैयक्तिकरित्या केलेले अर्ज विचारात घेण्यात येतील. एका वर्तमानपत्राच्या एका आवृत्तीतील एकापेक्षा जास्त पत्रकार सहभागी होवू इच्छित असतील तर एकाच पत्रकाराच्या साहित्याची निवड करुन संबंधीत संपादक संबंधित समितीकडे  ते पाठवतील.

            वृत्तपत्र बातमीदाराचे साहित्य अनेक वृत्तपत्रातून प्रसिध्द झाले असेल तर त्यासंबंधीचा एकत्रित अर्ज त्या संपादकांपैकी कोणतेही एक संपादक सबंधित समितीकडे पाठवतील. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी संबंधित जिल्हयातून प्रसिध्द होणारे वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले साहित्य विचारात घेण्यात येईल.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  अ,ब,क वर्गवारीतील वृत्तपत्रे, नियतकालिके यामध्ये  प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच पारितोषिकासाठी विचार करण्यात येईल.  प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे विभागस्तरवरील पारितोषिकासाठी आपोआप नामनिदर्शन होईल. अर्जदारांनी परिषिष्ठ ब मध्ये विहीत नमुन्यातील आपला अर्ज तीन प्रतीत जिल्हा, विभाग व राज्यस्तर समित्याकडे 15 जून 2019 पूर्वी पोहोचेल असा पाठवावा. 15 जूननंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. जिल्हा माहिती कार्यालय, महाराष्ट्र शासन, कॉम्पलेक्स, बॅरेक क्रमांक 1 गडचिरोली येथे परिपूर्ण प्रवेशिका सादर कराव्यात. अपूर्ण प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.