प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील दिव्यांगासाठीचा सुविधायुक्त जिल्हा बनविणार-सुधीर मुनगंटीवार

0
18

चंद्रपूर,दि.13 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात दिव्यांगांना विशेष दर्जा दिला आहे. जिल्ह्यामध्ये शेवटच्या पात्र दिव्यांगाला स्वयंचलित तीन चाकी सायकल देईपर्यंत ही योजना सुरू राहील. याशिवाय अंध दिव्यांगांना विशेष संगणक वितरित करण्यात येईल. दिव्यांगांच्या संदर्भातील सर्व योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील दिव्यांगासंदर्भातील सर्व उपाययोजना करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.
चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात दिव्यांगांना स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित दिव्यांग व त्यांच्या नातेवाईक, सहकाऱ्यांपुढे बोलताना त्यांनी देशात दिव्यांगाबाबत सुरू असलेल्या सर्व अभिनव योजनांची अंमलबजावणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार नानाभाऊ श्यामकुळे, वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सभापती राहुल पावडे, वनिता काकडे, तुषार सोम, दशरथ ठाकूर, वंदना पिंपळशेंडे, डॉ. मंगेश गुलवाडे, हिरामनजी खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत प्राप्त निधीतून अटल स्वावलंबन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये एक हजार सायकलीचे वितरण करण्यात येणार आहे.
श्री.मुनगंटीवार म्हणाले, दहा वर्षापूर्वी या सभागृहामध्ये दिव्यांगांना तीनचाकी सायकलींचे वितरण केले. राज्याच्या विधीमंडळामध्ये दिव्यांगासंदर्भात आमदार असल्यापासूनचा संघर्ष कायम आहे. दिव्यांग संदर्भात निर्णय घेताना संबंधित खात्याच्या मंत्र्याने केवळ एका मिनिटांसाठी आपण दिव्यांगाच्या जागी असतो तर काय झाले असते याचा विचार करून योजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आपण सभागृहात केले होते. त्यामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर दिव्यांगांना आणखी काय मदत देता येईल याकडे आपण अधिक लक्ष दिले आहे. बॅटरीवर चालणारी ही तीन चाकी सायकल आहे. केंद्र शासनाच्या कंपनीमार्फत ही सायकल तयार केली असून या कंपनीच्या बॅटरी संदर्भात कुठलीही अडचण असल्यास जिल्हा परिषदेच्या मार्फत सोडून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिव्यांगांच्या संदर्भात अतिशय जागृकतेने काम करत असून देशात ज्या ज्या ठिकाणी दिव्यांगांना संदर्भात जे काही चांगले सुरू असेल ते सर्व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केले जाईल. कुठेतरी असेच आपण स्वयंचलित सायकल बघितली होती. त्यानंतर कल्पना आली की आपल्या जिल्ह्यात याचे वितरण करता येईल का? आज हे वितरण करत असताना त्याचा आनंद होत आहे. जिल्ह्यातील अंध दिव्यांगांना देखील अशाच पद्धतीची मदत करण्याची आपली तयारी असून त्यांच्या अतिशय उपयोगी ठरणाऱ्या विशेष संगणकांचे वाटप येत्या काळामध्ये आपण अंधांना करू, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
यावेळी वनमंत्री म्हणून त्यांनी चला माझ्या ताडोबा या योजनेप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना ताडोबाची सहल मोफत घडवून आणली जाईल, असे आश्वासन दिले. ज्या पराक्रमी वाघाच्या जिल्ह्यांमध्ये आपण राहतो त्याबद्दलची इत्यंभूत माहिती, या ठिकाणची वन्य व निसर्ग संपदा अनुभवण्याची संधी सर्व दिव्यांगांना दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.अर्थमंत्री म्हणून बॅटरीवर चालणाऱ्या दुकानांसाठी आपण अर्थसंकल्पात २५ कोटीची तरतूद केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात एक हजार ‘शॉप ऑन व्हील’ वितरीत केल्या जाणार आहे. यामध्ये 100 गाड्या या चंद्रपूर जिल्ह्यासाठी असतील. त्या संदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आता पाच टक्के निधी हा दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र यामधून कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दिव्यांगांसाठी रोजगारासोबतच घरांच्या योजनेमध्ये देखील प्राधान्य देण्यात यावे ,असे त्यांनी यावेळी सांगितले .हे सरकार दिव्यांग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दिव्यांगांसाठी नियमितपणे काम करणारे निलेश पाझारे व कल्पना शेंडे या दोघांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. एका दिव्यांग मुलीने तिच्यापेक्षा अधिक आवश्यकता असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या दिव्यांग मुलीला सायकल देणार असल्याची घोषणा केली. तिच्या मनाच्या या मोठेपणाचे कौतुक करत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्हा वेगळा नसून त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही योजना तयार करायचे सांगितले जाईल. गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांना देखील स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वितरण करण्याची योजना बनविले जाईल, अशी घोषणा केली.
जिल्ह्यातील युवकांचा सरकारी नोकरीतील टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यांमध्ये मिशन सेवा अभियान सुरू आहे. यावेळी त्यांनी सर्व तालुक्यांमध्ये दर्जेदार अभ्यासिका निर्माण करण्याच्या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला. चंद्रपूरमध्ये ज्युबिली हायस्कूल, बाबा आमटे अभ्यासिका यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ज्ञानार्जन करत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. जगात सर्वात मोठी संपत्ती ही ज्ञान असून दिव्यांगांनी मिशन सेवा अभियानात सहभागी होऊन उत्तम यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांना मिशन सेवा अंतर्गत पुस्तकांच्या संचाचे देखील वाटप करण्यात आले.

प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी सुनील जाधव यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डिले यांनी जिल्ह्यामध्ये अतिशय प्रभावीपणे जिल्हा परिषदेमार्फत ही योजना राबविण्यात येईल, असे अभिवचन दिले. याशिवाय उपस्थित तरुणाईला आवाहन करताना त्यांनी या मोटरसायकलच्या मिळालेल्या पंखांचा नोकरी व्यवसायमध्ये यशस्वीपणे उपयोग करण्याचे आवाहन केले. आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी चंद्रपूरमध्ये सर्व दिव्यांगांना हा लाभ मिळणार असून सबका साथ सबका विकास या धोरणानुसार कोणीही यापासून वंचित राहणार नाही याबद्दल आश्वासन दिले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सुधीर मुनगंटीवार हे दिव्यांगा संदर्भात देवदूताचे काम करीत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात कुठेही अशा पद्धतीच्या शंभर टक्के सबसिडीवरील ट्रायसिकल वाटपाचा कार्यक्रम होत नसून केवळ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग व्यक्तींना हा लाभ होत असल्याचे स्पष्ट केले. समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमात स्नेहल कन्नमवार, प्रिया पारखी, अश्विनी वाळके, भावना आत्राम, पूजा धोटे, ललिता चव्हाण, सुरज झाडे, मुन्ना खोब्रागडे, मारूबाई कोटनाके, वृंदा राजूरकर, दर्शना चाफले, सतीश कोलते, वृंदा थावरे आदींना पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.