गडचिरोली जिल्हा मुख्यालयात योग दिनाचे आयोजन

0
7

गडचिरोली,दि.२०:- २१ जुन या दिवशी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत असतो .यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हे पाचवे वर्ष असून आयुष मंत्रालय नवी दिल्लीच्या प्रोटोकॉल प्रमाणे हा कार्यक्रम घेण्याच्या सुचना देण्यात आल्या.
राज्यातील प्रत्येक जिल्हयात, तालुका मुख्यालयी व ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम घेण्याविषयी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १३ जुन २०१९ रोजी जिल्हास्तरीय समितीतील सदस्यांची तसेच जिल्हयातील योग विषयक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटना, योगतज्ञ, योगप्रचारक इत्यादीना आमंत्रीत करुन सभेचे आयोजन करण्यात आले होते. व सदर सभेत सविस्तर चर्चा करुन जिल्हयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले.
जिल्हयात दिनांक २१ जुन २०१९ रोजी व्यापक प्रमाणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन होण्यासाठी ४४ शासकीय / निमशासकीय स्थळे निश्चित करण्यात आलेले आहे. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक योग तज्ञांच्या माध्यमातुन कार्यक्रमाचे आयोजन करावे अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. गडचिरोली तालुक्याच्या मुख्यालयी व जिल्हयाच्या मुख्यालयी क्रीडा प्रबोधिनी ,पोटेगांव रोड गडचिरोली व क्रीडा व सांस्कृतीक भवन , जलतरण तलाव, कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याशिवाय जिल्हा मुख्यालयातील विविध शासकीय विभाग तसेच विविध शैक्षणिक संस्था, येथे पतंजली योग समितीच्या विविध संघटनांच्या माध्यमातुन आर्ट ऑफ लिव्हींग च्या जिल्हा संघटनांच्या माध्यमातुन कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे.
तरी जिल्हयातील नागरिकांनी आपापल्या सोयीने जिथे शक्य होत असेल तेथे जाऊन आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी केले आहे.