पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगराध्यक्षांचा पुढाकार

0
16

– रेन वॉटर हार्वेस्टिंग लावणे बंधणकारक
– भविष्यात होणार लाभ
गोंदिया,दि.20 : पाणीटंचाई अतिशय भीषण समस्या आहे. यावर मात करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. गोंदिया शहराचा विचार केल्यास शहराला डांगोर्ली नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु, जून महिन्यात जर मान्सुनला उशीर झाला. तर उत्तराधार्थ शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. त्यासाठी भविष्यातील शाश्वत नियोजनासाठी नगराध्यक्षांनी पुढाकार घेऊन शासकीय इमारतींसह २०० चौरस मीटर पेक्षा जास्त आर.सी.सी. संरचणा असलेले बांधकाम अथवा विद्यमान बांधकामाला रेन वॉटर हार्वेस्टिंग लावण्याचे नपतर्फे बंधनकारक करण्यात आले आहे.
शासनाव्दारे जमिनीतील पाण्याचा स्तर वाढवून भविष्यातील येणाèया पाणी संकटाचा सामना करण्यासाठी व जमिनीतील पाणीसाठा वाढेल यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात कोणत्याच शासकीय इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिम सिस्टम लावण्यात आलेले नाही. जर सर्व शासकीय इमारतींमध्ये हे सिस्टीम लावण्यात आले तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात व्यर्थ जाणारे पाणी जमा होऊन जमिनीपर्यंत पोहचविल्या जाईल. जिल्ह्यात जवळपास ११०० ते १३०० मिमी पाऊस होतो. जर सर्व शासकीय इमारती व दोन मजली इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम लावण्यात आले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी गोळा करुन जमिनीतील स्त्रोतांपर्यंत पोहचवल्या जाऊ शकते. त्यामुळे भविष्यातील पाणी संकट टाळता येईल. हा उद्देश ठेवून गोंदिया नगर पालिकेचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी सर्वप्रथम पुढाकार घेत नपच्या माध्यमातून कार्यालयाच्या तीन इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग लावण्याचे निर्णय घेतले असून गोंदिया शहरातील नगर परिषदच्या सर्व शाळा, व्यापारी संकूल अशा ठिकाणी देखील हे सिस्टीम लावण्याचे निर्देश मागील आठवड्यात संबंधितांना दिले होते. दरम्यान, शहरातील २००.०० चौ.मी. पेक्षा जास्त असलेल्या आर.सी.सी. संरचना असलेल्या बांधकाम अथवा विद्यमान घराला  रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे काही अंशी जमिनीत पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे.
होणार दंडात्मक शुल्काची कारवाई…
शहरातील २००.०० चौ.मी. पेक्षा जास्त बांधकाम अथवा विद्यमान घराला रेनवाटर हार्वेस्टिंग लावण्याचे नगर परिषदेकडून बंधनकारक करण्यात आले असून शहरातील सर्प मालमत्ता धारकांनी याची नोंद घेऊन सदर प्रकल्प लावण्याचे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे. तर  तसे न केल्यास संबंधित मालमत्ता धारकाकडून मालमत्ता करासह दंडात्मक शुल्क घेण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.

भविष्यातील पाणीटंचाई दूर होणार : नगराध्यक्ष इंगळे
आजघडीला शहराला डांगोर्ली नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. गत वर्षीपासून जिल्हाधिकाèयांच्या मदतीने पुजारीटोला जलाशयाचे पाणी याठिकाणी आणून शहराची गरज भागविण्यात आली होती. परंतु, या सर्व बाबींना मर्यादा आहे. आता दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याचा उपसा वाढत असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावत जात असल्याने शहरातील जलस्त्रोत संपुष्टात येत आहे. यासाठी भूगर्भात पाण्याची पातळी वाढल्यास याचा लाभ नैसर्गिक जलस्त्रोतांना होणार आहे. त्यामुळे वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम ही काळाची गरज असून, यामुळे भविष्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे मत गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी व्यक्त केले.