ढाकणी येथे वृक्षारोपण वृक्षलागवडीसोबत संवर्धन महत्वाचे- सीमा मडावी

0
33

गोंदिया,दि.१ : आज वृक्षलागवड काळाची गरज झाली आहे. वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्याचे परिणाम आज दिसून येत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. यावर मात करण्यासाठी वृक्ष लागवडीसोबतच वृक्षांचे संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी यांनी केले.
आज १ जुलै रोजी गोंदिया तालुक्यातील ढाकणी येथे वन विभाग आणि गायत्री परिवाराच्या वतीने ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून श्रीमती मडावी बोलत होत्या. यावेळी उपवनसंरक्षक एस.युवराज, सहायक वन संरक्षक नरेंद्र शेंडे, एम.आर.शेख, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, ढाकणी सरपंच, उपसरपंच, गायत्री परिवाराचे गोविंद येडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील नांदवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती मडावी म्हणाल्या, वृक्ष लागवड मोहिमेत लोकांचा सहभाग असणे अत्यंत महत्वाचे आहे. ग्रामस्थांनी प्रत्येक वृक्षाची कुटूंबातील परिवातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली पाहिजे. वृक्ष लागवडीचे महत्व बालवयात विद्यार्थ्यांना पटवून दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
श्री. युवराज म्हणाले, जागतिक तापमानवाढीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड करुन त्याचे संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे आहे. भविष्यात भीषण दुष्काळाला सामना करण्याची वेळ येवू नये यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करुन त्याचे संवर्धन केले पाहिजे. यावर्षी जिल्ह्याला ८० लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
ढाकणी गावात विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढून वृक्ष लागवडीबाबत जनजागृती केली. ढाकणी येथील वन विभागाच्या रोपवनामध्ये स्थानिक प्रजातींच्या २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गायत्री परिवारातील सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.