वाशिम येथील वन महोत्सव रोपे विक्री केंद्राचे जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

0
22

वाशिम, दि. ०2 : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेस १ जुलै पासून सुरुवात झाली असून ३० सप्टेंबर पर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी वन परिक्षेत्र कार्यालयात वन महोत्सव रोपे विक्री केंद्र सुरु करण्यात आली आहेत. वाशिम वन परिक्षेत्र कार्यालयात वन महोत्सव रोपे विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या रोपे विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते झाले.यावेळी उपवन संरक्षक सुमंत सोळंके, सहाय्यक वनसंरक्षक किशोर येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय नांदुरकर यांच्यासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

वन महोत्सव रोपे विक्री केंद्रांवर स्वयंसेवी संस्था व नागरिकांना शासनाने ठरवून दिलेल्या सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याकरिता नागरिकांनी ‘हरित सेना’ (ग्रीन आर्मी) सदस्य म्हणून नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. हरित सेनेचा नोदणी क्रमांक दिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला पाच व प्रत्येक संस्थेला २५ रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वृक्ष लागवड मोहीम कालावधीत म्हणजेच ३० सप्टेंबर पर्यंत ही रोपे विक्री केंद्र सुरु राहणार आहेत. तरी नागरिकांनी व स्वयंसेवी संस्थांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.