शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
151

वाशिम, दि. ०४ : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्यावतीने राष्ट्रीयकृत बॅंकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेकरिता वाशिम जिल्ह्यासाठी १ लक्ष रुपयाच्या आतील व्यवसायासाठी ७५ तर १ लक्ष रुपयेपेक्षा अधिक रक्कमेच्या व्यवसायाकरिता ५५ लक्षांक प्राप्त झाला आहे. या कर्ज योजनेत महामंडळाचा १५ टक्के तर अर्जदाराचा १० टक्के सहभाग असून बँकेचा ७५ टक्के सहभाग राहणार आहे. योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज महामंडळाच्या यवतमाळ येथील दारव्हा रोडवरील उद्योग भवनमधील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयातून प्राप्त करून घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१९ पर्यंत असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत आहे. विहित मुदतीनंतर अर्ज वितरीत केले जाणार नाहीत व स्वीकारले जाणार नाहीत. वाशिम जिल्ह्यातील इच्छुकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या यवतमाळ शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे.

कर्ज योजनेतून १ लक्ष रुपयाच्या आतील व्यवसायाकरिता पीठ गिरणीसाठी ०३, पेपर डिश किंवा ज्यूस सेंटरसाठी ०३, दुग्ध व्यवसाय युनिटसाठी ३०, मंडप डेकोरेशन व लाउडस्पीकर केंद्रासाठी ०५, मळणी युनिटसाठी ०३, ऑटो वर्कशॉपसाठी १०, किराणा दुकानासाठी ०५, कापड दुकानासाठी ०३, इलेक्ट्रिक दुकानासाठी ०३, पापड, मसाला,शेवाळ्या या खाद्य उद्योगासाठी ०५ आणि कटलरी दुकानासाठी ०५ असा एकूण ७५ लाभार्थ्यांचा लक्षांक आहे. तसेच १ लक्ष रुपयांच्यावरील व्यवसायामध्ये वीटभट्टी युनिटकरिता ०५, कापड दुकानाकरिता ०९, डीटीपी संगणक किंवा झेरॉक्स सेंटरकरिता ०५, हॉटेल किंवा ढाबाकरिता ०५, स्टेशनरी दुकान ०५, खत बियाणे दुकानाकरिता ०५,ट्रॅक्टर ट्रॉली करिता ०५, पॉवर ट्रिलर (लहान) करिता ०५, मालवाहू मिनी ट्रककरिता ०२, प्रवासी वाहनाकरिता ०५, मालवाहू रिक्षाकरिता ०२ व औषधी दुकानाकरिता ०२ याप्रमाणे ५५ लाभार्थ्यांचा लक्षांक आहे.

कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करताना जातीचा दाखला, टी. सी., उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, आदिवासी विभागाचे नाव नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल (दोन लाखाच्या वरील व्यवसायाकरिता), रेशनकार्ड, व्यवसायाचे कोटेशन, आवश्यक परवाने (लायसन्स), ड्रायव्हिंग लायसन्स, लाभार्थी व जमानतदाराचा शेतीचा ७/१२ किंवा घराचा ८ अ नमुना, दोन पासपोर्ट फोटो आणि बँकेचा नाहरकत दाखला, ग्रामपंचायत अथवा नगरपरिषद यांचे नाहरकत प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज १ जुलै ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंतच्या वेळेत महामंडळाच्या यवतमाळ शाखा कार्यालयातून प्राप्त करून घ्यावा. या मुदतीनंतर अर्ज वितरीत केले जाणार नाहीत. अर्जाची किंमत १० रुपये असून  इच्छुकांनी स्वतः अर्ज घेऊन जावा, प्रतिनिधी पाठवू नये. अर्जाची फाईल दोन प्रतीत कार्यालयात सादर करण्याची मुदत १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत असून त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अपूर्ण कागदपत्रे असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०७२३२-२५३१६९ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. महामंडळाने या योजनेसाठी कोणतेही प्रतिनिधी नेमलेले नाहीत, याविषयी कोणी दलाली करताना आढळ्यास त्वरित महामंडळास लेखी कळवावे, असे आवाहन यवतमाळ येथील  शबरी आदिवासी वित्त व विकास मंडळाच्या शाखा व्यवस्थापकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.