नवेगाव-नागझिर्‍यात येणार पाच वाघिण-पालकमंत्री डॉ. परिणय फुके

0
19

भंडारा,दि.07ः-विपुल वनसंपदा आणि जैवविविधतेने नटलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात वाघांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु, अलिकडच्या काळात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या रोडावली असून वाघ वाढविण्यासाठी या जंगलामध्ये पाच वाघिण आणण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यासाठी पुढाकार घेतला असून येत्या दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून त्यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. नवेगाव-नागझिरा, कोका, उमरेड-कर्‍हांडला या अभयारण्यात दररोज पर्यटकांची गर्दी होत असते. सर्वात जुने असलेल्या नवेगाव-नागझिरा अभयारण्यात पूर्वी मोठय़ा प्रमाणात वाघ असल्याने पर्यटकांची पावले अभयारण्याकडे वळायची. परंतु, नंतरच्या कालावधीत वाघांची संख्या रोडावल्याने पर्यटकांनीही या अभयारण्याकडे पाठ फिरविली आहे.
नवेगाव-नागझिर्‍यातील जंगल ‘डेन्स फॉरेस्ट’ आहे. या घनदाट जंगलात मोठमोठे झाडे असल्याने ‘ग्रॅस लॅंड’ नाही. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्या या जंगलात कमी आहे. तृणभक्षी प्राणी नसल्याने आपसूकच या जंगलात वाघांची संख्या नगण्य आहे. या अभयारण्यात वाघांची संख्या रोडावण्याचे हे प्रमुख कारण आहे. याशिवाय रानकुत्र्यांची असलेली मोठी संख्या हेसुद्धा एक कारण मानले जात आहे.
वन राज्यमंत्री म्हणून डॉ. परिणय फुके यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा विकास करण्यावर त्यांनी प्राथमिकता दिली आहे. याबाबत त्यांनी दोन दिवसांपूर्वी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची नागपूर येथील वन भवनात बैठक घेतली. या बैठकीत नवेगाव-नागझिर्‍यात वाघांची संख्या रोडावल्याचे सदर कारण समोर आले. तेव्हा या व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढविण्यासाठी पाच वाघिण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पाच वाघिणींमुळे व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे नवेगाव-नागझिर्‍यातील रोडावलेले पर्यटन पुन्हा सुरू होईल आणि त्यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. याबाबतची प्रक्रि या सुरू झाली असून परवानगी मिळाल्यानंतर येत्या दोन महिन्यात पाचही वाघिणींना व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे.