महसुल कर्मचार्‍यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0
27

गोंदिया ,दि.१०ः-: विभागीय महसूल कर्मचारी संघटना विभाग नागपूरच्या नेतृत्त्वात गोंदिया जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचार्‍यांनी आज 10 जुलै रोजी महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या दुसरा टप्यात सामूहिक रजेचा अर्ज देत निदर्शने करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारासमोर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे नेते पी.जी.शहारे यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला.तर उद्या 11 व 12 जुलै, 2019 रोजी सर्व कर्मचारी हे कार्यालयात हजर राहून लेखनीबंद आंदोलन करणार असल्याचे जाहिर करण्यात आले.या आंदोलनात महसुल कर्मचारी संघटनचे जिल्हा अध्यक्ष राजेश मेनन,सचिव आशिष रामटेके,कार्याध्यक्ष राकेश डोंगरे,सुपचंद लिल्हारे,महेश कांचनवार,विठ्ठल राठोड,अतुल कडू,मुकुंद तिवारी,पवन बिसेन,संजय सांगोडे,मोहसीन खान,एन.के.पराते,चैताली मानकर,सोनाली भोयर,रुपचंद नाकाडे,संतोष नान्हे,कांता साखरे,आर.बी.भाजीपाले,सुरेंंद्र भजनकर,नरेंद्र तिवारी आदींचा समावेश होता.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कर्मचारी आंदोलनावर बसले आहेत.

नागपूर विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या संवगार्ची पदे परस्पर अदलाबदलीने भरण्यात यावीत, पुरवठ्यातील अव्वल कारकून पदावर महसूलच्या कनिष्ठ लिपीकांना किंवा पदोन्नती देण्यात यावी, नागपूर विभागातील महसूल कर्मचार्‍यांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, नागपूर विभागातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने विधानसभा निवडणुकीपुर्वी भरण्यात यावी, सरळ सेवा कोट्यातील नायब तहसीलदारांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावी, पदोन्नती झालेल्या नायब तहसीलदारांना नियमित पदाचा कारभार देण्यात यावा, सेवानवृत्त होणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना मागविण्यात येणार्‍या नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करावी. या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.