राष्ट्रवादीच्या आमदार बरोरा यांनी शिवबंधन बांधले

0
20

मुंबई ,दि.१०ः– शहापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दादरमधील शिवसेना भवन येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. त्यावेळी, आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, यांसह शिवसेना आणि बरोरा यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते.बरोरा यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यावेळीही, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे बरोरा यांच्यासमवेत हजर होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून बरोरा शहापूर मतदारसंघाचे उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित झाले आहे.

ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर पांडुरंग बरोरा यांच्याकडे राष्ट्रवादी नेते म्हणून पाहिले जात होते. कारण, १९८० पासून बरोरा कुटुंब राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्याशी स्नेहसंबंध जोडून होते. मात्र, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादची होत असलेली पिछेहाट आणि शिवसेना-भाजपा नेत्यांचे वाढते प्रस्थ लक्षात घेऊनच बरोरा यांनी शिवबंधन हाती बांधल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही बरोरा यांचे पक्षात स्वागत केले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आगामी तीन ते ४ महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आमदारांकडूनही पक्षबदलीच्या हालचाली सुरू आहेत.