पोलीस मुख्यालयात शास्त्रोक्त गुन्हे तपासावर कार्यशाळा

0
22

गोंदिया,दि.११ : पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात जिल्हा पोलीस व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रोक्त गुन्हे तपास व गुन्हे दोषसिध्दी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू ह्या होत्या. कार्यशाळेचे उद््घाटन न्या.सुहान माने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी संजय भट्टाचार्य, सह दिवाणी न्यायाधीश निरंजन वानखेडे, न्या.विकेश आसुदानी, न्या.वैभव पुरी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेत गोंदिया जिल्हा पोलीस दलातील अपर पोलीस अधिक्षक, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि पोलीस स्टेशनमध्ये गठीत करण्यात आलेल्या तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस स्टेशन मधील कमीत कमी दोन बिटचे तपासी अंमलदार व मदतनीस तसेच पोलीस अधिक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, सीएमएस सेल, विशेष तपास पथक (महिला अत्याचार), महिला सेल, पोलीस स्टेशन मधून कोर्टात कामकाज पाहणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना नामनिर्देशित करण्यात आले होते.
कार्यशाळेत मान्यवरांनी उत्कृष्ट तपास कसा करावा व दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर आरोपीला शिक्षा कशी होईल, या संदर्भात करावयाच्या कार्यपध्दती विषयी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाठयांना मार्गदर्शन करण्यात आले. या एक दिवसीय कार्यशाळेला पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३३ अधिकारी व ११0 कर्मचारी उपस्थित होते.