गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात १९ गोदाम उभारणार- डॉ.परिणय फुके

0
20

गोंदिया  दि. १७ :: हमी भावाचा फायदा आदिवासी शेतकरी व अन्य शेतकऱ्यांना व्हावा, या सोबतच उत्पादीत धान, भरड धान्यास योग्य किंमत मिळवून देण्याकरीता आदिवासी विकास महामंडळामार्फत धान्य खरेदी योजना राबविण्यात येते. या अंतर्गत हमी दरापेक्षा कमी भावात विकावे लागू नये म्हणून आदिवासी विकास मंडळामार्फत १९ गोदाम उभारण्याचे निर्देश गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी आज १७ जुलै रोजी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व आदिवासी विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात १२ गोदाम उभारले जाणार असून या ठिकाणी गोदाम बांधण्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश सुध्दा त्यांनी यावेळी दिले. एक गोदाम २० हजार क्विंटल धान्यसाठ्याचे असून यामध्ये जवळपास ४ ते ५ हजार शेतकऱ्यांना आपले धान्य या गोदामामध्ये ठेवता येणार आहे.गोंदिया सोबतच गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात सुध्दा ७ गोदामापैकी ५ ठिकाणी जागा उपलब्ध करुन दिली असून या ठिकाणी गोदामचे काम सुरु करण्याचे आदेश देखील डॉ.फुके यांनी दिले. या बैठकीत आदिवासी विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.