जिल्हा कारागृहातील जलशुद्धीकरण सयंत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

0
30

वाशिम, दि. १७ :जिल्हा कारागृह येथे बंदिजनांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी बसविण्यात आलेल्या जल शुद्धीकरण सयंत्राचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते झाले. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून हे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. एस. हरण, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक एम. पी. वावगे, नगरपरिषदेचे तेजस पाटील, तुरुंग अधिकारी आर. एच. भापकर व एस. एस. हिरेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा कारागृहातील बंदिजनांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जलशुद्धीकरण सयंत्र खरेदी करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी निधी मंजूर केला होता. या निधीतून ५०० लिटर प्रतितास पाणी शुद्ध करण्याची क्षमता असलेले सयंत्र जिल्हा कारागृहात बसविण्यात आले आहे, अशी माहिती श्री. पाडुळे यांनी यावेळी दिली.
जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हा कारागृह परिसरात आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कारागृह परिसरात ४५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून त्याकरिता आवश्यक तयारी पूर्ण झाली असून आतापर्यंत २०० रोपांची लागवड करण्यात आली आहे.