शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्यावत करण्याबाबत आवाहन

0
20

वाशिम, दि. १९ : नियोजन विभागाच्या १४ ऑगस्ट २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा १ जुलै २०१९ या संदर्भ दिनांक रोजीचा सर्वंकष माहिती कोष तयार व अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यासाठी व अद्ययावत करण्यासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वाशिम येथून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घ्यावा, असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी कळविले आहे.

आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती संगणकीय ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविल्यानंतर त्यांना जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत माहिती प्राप्त झाल्याचे पहिले प्रमाणपत्र देण्यात येईल. सदरचे पहिले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर २०१९ च्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास ही देयके कोषागार कार्यालय अथवा अधिदान व लेखा कार्यालयात स्वीकारली वा पारित केली जाणार नाहीत. तसेच सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी संगणकीय ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविलेली माहिती तपासल्याचे व ती बरोबर असल्याचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालयाचे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी २०२० च्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास ही देयके कोषागार कार्यालय अथवा अधिदान व लेखा कार्यालयात स्वीकारली वा पारित केली जाणार नाहीत. लॉगीन आयडी व पासवर्ड करिता संबंधित कार्यालयाचा डीडीओ कोड आवश्यक आहे, असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी कळविले आहे.