अहेरी भामरागड येथील २०८ गावांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर

0
10

गडचिरोली,दि.२०:- गडचिरोली जिल्हयातील सन २०१८-१९ च्या हंगामातील पिकांची अंतीम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी पैसेवारी आलेली आहे, त्या २०८ गावांची तालुकानिहाय व गावनिहाय यादी जाहीर झालेली आहे.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २१ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार या सर्व गावांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्या २०८ गावात आता जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट, शालेय /महाविद्यालयीन परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे, इत्यादी सवलती देण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक उपाययोजनाही त्याठिकाणी राबविण्यात येणार आहेत. या बाबत संबंधीत तालुक्यांना असे जिल्हाधिकारी यांनी अंमलबजावणीच्या लेखी सुचना दिल्या आहेत.