गोरगरीबांची शासकीय कामे त्वरीत व्हावी-पालकमंत्री डॉ. परिणय फुके

0
6

सालेकसा तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
सालेकसा दि. २१ : सालेकसा हा तालुका राज्याच्या टोकावर आहे. हा तालुका दुर्गम, आदीवासी बहुल आणि नक्षलग्रस्त आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसिल कार्यालयात शासकीय कामानिमित्त बाहेरगावावरुन गोरगरीब लोक येतात. आता त्यांची कामे या नवीन इमारतीतून त्वरीत झाली पाहिजे. असे मत पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केले.
सालेकसा तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण २० ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.केशवराव मानकर,माजी आ.भेरसिंग नागपुरे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अलताफ हमिद, जि.प महिला व बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, नगराध्यक्ष विरेद्र उईके, जि. प सदस्य दुर्गा तिराले, परसराम फुंडे, तहसिलदार श्री. पित्तुलवार यांची उपस्थिती होती.
डॉ. फुके म्हणाले, हा भाग दुर्गम नक्षलग्रस्त असल्यामुळे या तालुक्याच्या विकासाला गती मिळाली पाहिजे यासाठी अधिकारी- कर्मचारी इथे निवासी असले पाहीजे. या इमारतीमूळे गोरगरिब जनतेची व नागरिकांची कामे एकाच छताखाली लवकर होण्यास मदत होईल. गोरगरिबांच्या पैशातुन कर स्वरुपात पैसा उपलब्ध होतो तोच पैसा निधी म्हणुन विकास कामात येतो. त्यामुळे गरिबांच्या पैशाची जाणिव ठेवून विकासकामे चांगल्याप्रकारे झाली पाहिजेत. हाजराफॉल व कचारगडच्या विकासासाठी निधी देण्यात आला आहे. सालेकसा नगराच्या विकासाकरिता नगरपंचायतला ८ कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहे. आमगाव- देवरी विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात १ हजार कोटी रुपयांची कामे झाल्याचे त्यांनी सांगितले.
सालेकसा, देवरी आणि आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणुक करण्यासाठी प्रशासनाने तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करावे असे सांगून डॉ. फुके म्हणाले, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होईल. जिल्हातील नागरिकांच्या भेटी घेवून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणुन घेवून त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार पुराम म्हणाले, अनेक वर्षापासुन येथे तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीची आवश्यकता होती.आज ती लोकार्पणामुळे पूर्ण झाली आहे. तालुक्याच्या विकासाला गती मिळाली आहे.मुरकुडडोह- दंडारी या रस्त्यासाठी १७ कोटी रुपये मंजुर झाले आहे. भजेपार-बोदलबोडी दरम्यान असलेल्या नदीवर पूल बांधण्यासाठी ६ कोटी रुपये मंजुर झाले आहे. या भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. दरेकसा- जमाकुडो या भागात रुग्णांना त्वरीत उपचार मिळाले पाहिजे यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहीका या भागात उपलब्ध झाली पाहिजे असे ते म्हणाले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानातंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील अनुसया हत्तीमारे, धुरपता मेंढे, रंभा मेंढे, भगवंती शहा, हारबी शहा,चमेली सय्यद, जेलनबी शहा,जहारा शहा, बनेरबी शहा, मौसम शहा, नजमा सय्यद,हमिरबी सय्यद,अफसाना शहा ,सलमाबानो शहा, बशीरन सय्यद, शहेजनबी शहा या लाभार्थांना रेशन कार्डचे, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेचे धनादेश लक्ष्मीबाई तरोणे, तारा नवाडे यांच्यासह अन्य लाभार्थांना तर भागरथा ब्राम्हणकर, शिला जंगेरे,गिता डोये, जीवनकला साखरे यांच्यासह अन्य लाभार्थ्यांना गॅस जोडणी देण्यात आली.
कार्यक्रमाला तहसिल कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री डॉ. फुके यांनी फित कापुन तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले. तहसिल कार्यालय परीसरात पालकमंत्र्यांनी वृक्षारोपण केले. प्रास्ताविक तहसिलदार पित्तुलवार यांनी केले. संचालन प्रा.श्रीमती बोपचे व प्रा. गणेश भदाडे यांनी केले.