व्याघ्र प्रकल्पाच्या विकासातून पर्यटनाला चालना मिळणार – पालकमंत्री डॉ. परिणय फुके

0
16

नवीन वनभवन इमारतीचे लोकार्पण
गोंदिया दि. २१ : गोंदिया जिल्ह्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे वैभव आहे. देशातील चांगल्या व्याघ्र प्रकल्पापैकी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा एक आहे. पर्यटक मोठया संख्येने या व्याघ्र प्रकल्पाला भेटीला आले पाहिजे यासाठी ब्रम्हपुरी वनविभागातुन पाच वाघ या प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. वाघाच्या अस्तिवामुळे वाघ बघण्यासाठी पर्यटक मोठया प्रमाणात या प्रकल्पाला भेट देतील. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाच्या विकासाला गती मिळुन पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
नवीन वनभवन इमारतीचे लोकार्पण २० ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. फुके यांनी केले. यानिमित्त्याने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. रामानुजम, उपवनसंरक्षक एस. युवराज, नगर पालिकेचे उपाध्यक्ष शिव शर्मा, नगरसेवक घनश्याम पानतावने, बेबी अग्रवाल, बंटी पंचबुध्दे, सुनिल केलनका, महेंद्र मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. फुके पुढे म्हणाले, जिल्ह्यातील जंगलाचे संरक्षण करतांना मृत्यूमूखी पडलेल्या वनरक्षकांच्या स्मरणार्थ या परिसरात त्यांचे स्मारक बांधण्यात येईल. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने सुविधा निर्माण करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्षेत्रातील नामांकित कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला असुन त्यांच्या मदतीने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी होम-स्टे ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्हातील जे जूने वाडे आहेत तेथे पर्यटकांना मुक्कामाचा आनंद घेता यावा यासाठी वाडयांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी २ लाख रुपये देण्यात येतील. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. विदेशातील पर्यटकसुध्दा या होम-स्टे कडे आकृष्ट होतील. आता वन विभागाला आपण गतिमान करणार असुन आता वन विभागाची कोणतेही कामे रखडणार नाही याची दक्षता वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे ते यावेळी म्हणाले.
प्रारंभी पालकमंत्री डॉ. फुके यांनी फित कापून नवीन वनभवन इमारतीचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी परिसरात वृक्षारोपण केले. या इमारतीत आता वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, उपवनसंरक्षक, गोदिंया वनविभाग आणि विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग गोंदिया यांचे कार्यालय स्थानांतरीत झाले आहे. इमारतीच्या बांधकामावर ४ कोटी ९६ लक्ष रुपये खर्च करण्यात आले.
कार्यक्रमाला तिनही विभागाचे अधिकारी-कर्मचारी, वन्यजीव प्रेमी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. रामानुजम यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार सहाय्यक उपवनसंरक्षक नरेंद्र शेंडे यांनी मानले.