केंद्राच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- खा.सुनिल मेंढे

0
14

गोंदिया,दि.२२ : केंद्र सरकारच्या अनेक लोककल्याणकारी तसेच ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाच्या योजना आहेत. या योजनांची संबंधित यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणी करुन त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात असे निर्देश खासदार सुनिल मेंढे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात २२ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेतांना श्री.मेंढे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, परिविक्षाधीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हाश्मी,  निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, लेखाधिकारी श्री.बावीस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळाला पाहिजे असे सांगून श्री.मेंढे म्हणाले, यासाठी आरोग्य विभागाने तळागाळापर्यंत या योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली पाहिजे. यासाठी यंत्रणांनी सकारात्मक दृष्टीने काम करावे. लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठी यंत्रणांनी त्यांच्याशी सौजन्याने वागून त्यांचे समाधान करावे. ज्या गरीब कुटूंबांकडे घर बांधण्यासाठी स्वत:ची जागा नाही त्यासाठी ५० हजार रुपये त्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेतून जागा खरेदी करण्यासाठी दयावी. हे काम गतीने करावे असे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीच्या काळात ज्या घरांची, गोठ्यांची पडझड झाली आहे त्याचे वस्तुनिष्ठ सर्व्हेक्षण करुन संबंधितांना लाभ देण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असे सांगून श्री.मेंढे पुढे म्हणाले, ज्या तीन व्यक्तींचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटूंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी संबंधित विभागाने करावी. त्यामुळे त्यांना कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ देता येईल. शेतकरी सन्मान योजनेतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजना व इंदिरा आवास योजनेअंतर्गत २०११ च्या सर्व्हेनुसार २८ हजार ५९५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. तर सन २०१९-२० या वर्षासासाठी प्रधानमंत्री आवास योजनचे २१ हजार १२८ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री.मुंढे यांनी दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत ५६ हजार ८४० कामगार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी १८ हजार ८८७ कामगारांना अवजारे खरेदी व इतर विविध योजनांकरीता ६ कोटी ४८ लाख रुपयांचा लाभ देण्यात आल्याचे सहायक कामगार आयुक्त श्री.लोया यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अठराव्या ग्रीन लिस्टनुसार जिल्ह्यातील ७७ हजार ४६४ खातेदार शेतकऱ्यांची २२३ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली असून केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेत जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ३१७ पात्र लाभार्थी असून पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचा लाभ जिल्ह्यातील १ लाख २२ हजार १४२ शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक श्री.कांबळे यांनी दिली.
यावर्षी काही ठिकाणी आलेल्या अतिवृष्टीमुळे २४८ घरे व ३३ गोठे बाधीत झाली तर ३ व्यक्तींचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी यावेळी सांगितले.