गडकरी सिमेंट कंपन्यांचे एजंट, फडणवीस बिनकामाचे

0
14

नागपूर- नितीन गडकरी हे सिमेंट कंपन्यांचे एजंट आहेत, डांबरातून पैसे खायला मिळत नसल्याने गडकरी डांबरी रस्त्यांऐवजी सिमेंटचे रस्ते बांधत सुटले आहेत. सिमेंटवाले लोक गडकरींच्या घरी थैल्याच्या थैल्या भरुन पाठवत आहेत असा घाणाघाती आरोप नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर केला आहे.मोदी सरकारच्या प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात नागपूर शहर तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सयुक्तरीत्या मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत या नेत्यांनी केले.केंद्रातील मोदी सरकारचा प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायदा हुकूमशाही पद्धतीचा राहणार असून, कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस तो लागू होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.संविधान चौकातील जाहीरसभेत बोलताना मुत्तेमवार, वासनिक, राऊत या नेत्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची चिंता करण्यापेक्षा भाजपने केंद्रातील सरकार चालवण्याकडे लक्ष द्यावे, अशी टीका करताना माजी खासदार विलास मुत्तेमवार म्हणाले की, मोदींची कार्यशैली पाहिल्यावर ते देश नव्हे, तर विदेश चालवत असल्याचे दिसते. हुकूमशाही पद्धतीने सरकारने भूमी अधिग्रहण वटहुकूम आणला असून, काँग्रेस तो कुठल्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही. कुठलीही जमीन अधिग्रहित करून ती कुणालाही देण्याचे अमर्याद अधिकार सरकारला मिळणार असल्याने प्रस्तावित कायदा हा शेतकरीविरोधीच आहे. त्यामुळे सरकारने यूपीएने आणलेला कायदा तंतोतंत लागू करावा अन्यथा काँग्रेस राष्ट्रव्यापी आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.