मंडोलीच्या जंगलात पोलिस-नक्षल चकमक

0
8

गडचिरोली-गडचिरोली पोलिस मुख्यालयातील विशेष अभियान पथक (सी-६०) एटापल्ली उपविभागातील कोटमी पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणार्‍या मंडोली जंगल परिसरात शोध मोहीम राबवित असताना नक्षल्यांनी अचानक हल्ला चढविला. यावेळी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार, तर दोघे जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्यातील एटापल्लीसारख्या नक्षलसदृश आणि अतिसंवेदनशील भागात स्थापन झालेल्या नवनिर्मित पोलिस मदत केंद्र कोटमी येथे सामाजिक उपक्रम व नक्षलविरोधी अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या मनात पोलिसांनी चांगले स्थान निर्माण करून नक्षल हालचालींवर वचक बसवला आहे. येथे पोलिसांचा वाढता प्रभाव व नक्षल्यांचे वर्चस्व कमी झाल्याने नैराश्येपोटी कसनसूर नक्षल दलमने कोटमी पोलिस मदतकेंद्रावर हल्ला करण्याची योजना आखली असल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलिस दलाचे विशेष अभियान पथक (सी-६०) तेथे दाखल झाले. दरम्यान, अभियान राबवित असताना पोलिस व नक्षली यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. या चकमकीनंतर गुप्तचर खात्याने शोध मोहीम राबविली असता, चकमकीत एक नक्षलवादी ठार, तर दोघे जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. कोटमी पोलिस मदत केंद्राच्या भागात नक्षल्यांचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.