विदर्भातील पर्यटनस्थळाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न- मुख्य सचिव

0
13

नागपूर दि. १४-: विदर्भातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केली. नागपूर विभागातील पर्यटनस्थळे, कृषी, स्वच्छ भारत अभियान, खरीप हंगाम आढावाबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आदींच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मुख्य सचिवांनी नागपूर शहरातील हजरत ताजुद्दीन बाबा दर्गा, रामटेक येथील मंदिर आणि वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाच्या विकासकामांबाबत आढावा घेतला. सेवाग्राम येथे महात्मा गांधींच्या आगमनाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि 2018 साली त्यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त विकास कामांबाबत माहिती घेतली. यासोबतच शासनाच्या स्वच्छ भारत अभियान उत्तमरितीने पार पाडत असताना सर्व शासकीय अधिकारी तथा कर्मचारी यांनी आपला सहभाग वाढविण्याच्या सूचना केल्या.
विभागातील नागरी तथा ग्रामीण भागातील प्लॅस्टिक वापर बंदीवर काय उपाययोजना करता येईल याबाबत तसेच नागपूर जिल्हा तथा विभागातील आरोग्यविषयक आढावा घेताना मुख्य सचिवांनी स्वाईन फ्लूबाबतची सद्य:स्थितीही जाणून घेतली. विभागातील धान्य गोदामांच्या स्थितीबाबतही त्यांनी आढावा घेतला.
मुख्य सचिवांनी शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी तातडीने करणे, आधार नोंदणी मोहीम तीव्र करणे, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, रहिवाशी तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र शाळेत पुरविण्याची मोहीम राबविण्याबाबत सूचना दिल्या.

मुख्य सचिवांकडून खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचा आढावा

मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी राज्याच्या 2015-16 च्या खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. यामध्ये नागपूर विभागातील 6 मध्यवर्ती सहकारी बँका असून, त्यापैकी वर्धा व नागपूर या आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्यामुळे त्या 2 वर्षांपासून पीककर्ज वाटप करीत नसल्याचे सांगण्यात आले. गतवर्षी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचा 553 कोटींचा लक्षांक ठेवण्यात आला होता. त्यात यंदाच्या पीक कर्ज वाटपाच्या 256 कोटी लक्षांकाची वाढ झाली आहे. त्यामध्ये चंद्रपूर 383, भंडारा 285, गडचिरोली 53 आणि गोंदिया 88.66 अशी लक्षांकामध्ये वाढ करण्यात आली आहे.