बेकायदेशीर गर्भलिंग निदान, डॉक्टरला कारावास

0
10

नागपूर ता.२२: प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याने उमरेड येथील डॉ. अभय श्रावण पराते यांना उमरेडच्याच प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी श्रीमती व्ही.एल. भोसले यांच्या न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास आणि १0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रकरण असे की, गर्भलिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत डॉ. सचिन तडस हे समुचित प्राधिकारी आहेत. त्यांनी २९ जून २0११ रोजी डॉ. अभय पराते यांच्या सिद्धी अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी अँण्ड एक्स-रे लॅबला आकस्मिक भेट देऊन पाहणी केली असता पराते हे प्राधिकार्‍याला कोणतीही पूर्वसूचना न देता सोनोग्राफी मशीनचा वापर करताना आढळून आले होते.
या केंद्रात सोनोग्राफीसाठी आलेल्या रुग्णांचे ‘एफ’ फॉर्म भरण्यात आलेले नव्हते. मुळात एफ फॉर्म या ठिकाणी नव्हतेच. डॉ. तडस यांच्या तक्रारीवरून डॉ. पराते यांच्याविरुद्ध उमरेड पोलीस ठाण्यात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा १९९४ तसेच १९९६ च्या नियम ९ (१)(४), १३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा सिद्ध झाल्याने या दोन्ही प्रकरणात न्यायालयाने डॉ. पराते यांना प्रत्येकी ३ वर्षे कारावास आणि १0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागतील. याशिवाय डॉ. पराते यांना सुपूर्दनाम्यावर देण्यात आलेली मशीनही न्यायालयाने परत मागितलेली आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील आनंद ठाकरे यांनी काम पाहिले.