प्रत्येक शेतकर्‍याने कृषी विभागाच्या सहकार्याने माती परीक्षण करावे

0
16

तिरोडा दि. २७ : जमिनीतून अधिकाधिक उत्पन्न काढण्यासाठी माती परीक्षण करावे. माती परीक्षणामुळे जमिनीतील मुलद्रव्यांची जाणीव होते. त्यामुळे कोणत्या आणि किती खताची मात्रा द्यावी, कोणत्या धानाची लागवड करावी, हे कळते. यासाठी प्रत्येक शेतकर्‍याने कृषी विभागाच्या सहकार्याने शेतातील मातीचे परीक्षण करावे, असे विचार आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केले.
तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत मृद आरोग्य पत्रिका अभियान सन २0१५-१६ चे शुभारंभ करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, सरपंच देविका उईके, उपसरपंच सिद्धार्थ खोब्रागडे, पाणलोट समितीचे अध्यक्ष प्यारेलाल पटले, चतुर्भुज पटले प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होता.
संचालन मंडळ कृषी अधिकारी के.आर. रहांगडाले यांनी तर आभार कृषी सहायक डोंगरवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रभारी मंडळ कृषी अधिकारी बोरकर (मुंडीकोटा), के.आर. रहांगडाले (तिरोडा), कृषी पर्यवेक्षक किंदर्ले (मुंडीकोटा), कृषी सहायक डोंगरवार, कृषी पर्यवेक्षक कुकडे, कृषी सहायक शिंदे व रिनाईत यांनी सहकार्य केले.