महापुरूषांच्या छायाचित्रावरून राष्ट्रवादीचा रोष

0
11

गोंदिया दि.२७-: दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे स्थानकांवरून महापुरूषांचे छायाचित्र हटविण्याचा आदेश सर्व रेल्वे स्थानकांच्या व्यवस्थापकांना दिला आहे. कंसल यांचा हा आदेश राष्ट्रपुरूषांचा अपमान करणारा असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार दिलीप बन्सोड, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी आदींनी केली.विभागीय व्यवस्थापकांच्या आदेशावरून काचेवानी, गंगाझरी, मुंडीकोटा, गोंगले पांढरी या स्थानकांवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटविण्यात आले आहे. यामुळे सर्वत्र रोष वाढला आहे.विभागीय व्यवस्थापक कंसल हे आज गोंदियात आले असताना त्यांना बन्सोड व इतर पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपण असा आदेश दिल्याचे मान्य करीत तसा कायदाच असल्याचे सांगितले. मात्र त्या कायद्याची प्रत मागितली असता दि.२९ ला देऊ असे त्यांनी सांगितल्याचे बन्सोड म्हणाले.हे प्रकरण माहित झाल्यानंतर खा.प्रफुल्ल पटेल यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करीत हा प्रकार सहन करणार नसल्याचे सांगितले. याप्रकरणी कंसल यांच्याकडून योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास दि.३० ला राष्ट्रवादी काँग्रेस खा.पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करेल, असा इशारा बन्सोड यांनी पत्रपरिषदेत दिला.