जलयुक्त शिवार अभियानाची कामे 30 जूनपूर्वी पूर्ण करा – पालकमंत्री

0
6

वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा प्राधान्याने विचार करून शासनाच्या महत्त्वपूर्ण अशा जलयुक्त शिवार अभियानातील कामे प्रभावीपणे, गुणवत्तापूर्णरित्या 30 जूनपूर्वी पूर्ण करावीत अशी सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.प्रारंभी जिल्हाधिकारी संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या कामाबाबत सविस्तर माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली.
विकास भवन येथे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, सदस्य सचिव भाऊसाहेब बऱ्हाटे आदींची उपस्थिती होती.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्याकरिता अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधींना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत होत असलेल्या कामांबाबतचा आढावा, सुरू असलेल्या कामांची यादी उपलब्ध करून द्यावी. आठवड्यातून किमान पाच कामांची लोकप्रतिनिधींसह पाहणी करावी. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींची जलयुक्त शिवार अभियानाबाबत विस्तृत बैठक, कार्यशाळाही लवकरात लवकर घेण्यात यावी. अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती लोकप्रतिनिधींसह, कंत्राटदार, ग्रामपंचायतस्तरापर्यंत पोहोचविण्यात यावी. वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करावे.
अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांबाबतच्या फाईलवर किमान सात दिवसांच्या आत, तातडीने निर्णय घ्यावा. अभियानातील कामांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. ज्या विभागांचा कामाचा वेग कमी आहे, त्यांनी वेळेत लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. पूर्ण करण्यात आलेल्या सर्व कामांचे छायाचित्र जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करावीत. कामांची गुणवत्ता तपासून उत्तम दर्जाचे काम करावे, अशा सूचना सर्व विभागांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.