पर्यावरणाबाबत जागरुकता काळाची गरज – डॉ. विजय सूर्यवंशी

0
17

गोंदिया दि.३: वृक्ष लागवड व त्याची जोपासना करण्याचे गांभीर्य आज कमी झाले आहे. भविष्यात पर्यावरणाच्या असंतुलनामुळे प्राणवायूसुद्धा विकत घेण्याची वेळ येणार आहे. भविष्यातील धोके लक्षात घेता पर्यावरण संतुलनाबाबत प्रत्येक नागरिकाने जागरुक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
तिरोडा तालुक्यातील अत्री येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ 3 ते 9 जून या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या पर्यावरण सप्ताहाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. सूर्यवंशी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. योगेंद्र भगत, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांची उपस्थिती होती.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळात जंगल असताना सुद्धा त्यांनी वृक्षांची लागवड करुन जोपासणा केली. महाराजांनी एक फतवा काढून वृक्ष कटाईसाठी परवानगी घेण्याची सूचना केली होती. शालेय जीवनापासून वृक्ष लागवड व जोपासण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणे आवश्यक आहे.

चौथ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अत्री येथील शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान 10 झाडे लावावीत व त्याची जोपासना करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी केले. ते पुढे म्हणाले, येणाऱ्या काळात एक आदर्श काम अत्री ग्रामस्थांनी पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रात करुन इतरांसाठी आदर्श निर्माण करावा. या गावातील प्रत्येक व्यक्तीने 9 वृक्षांची लागवड व जोपासना करुन प्राणवायूचा ताळेबंद पाण्याच्या ताळेबंदाप्रमाणे करावा. वृक्ष लागवडीचे नियोजन करुन पक्षांनासुद्धा निवाऱ्यासाठी कसा उपयोग होईल असे वृक्ष लावावे.
विजय रहांगडाले म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणात असंतुलन निर्माण होत आहे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाप्रती जागरुक होणे आवश्यक आहे. वृक्ष हे आपले मित्र असून त्याची जोपासना करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना व अभियानात जनतेने प्रशासनाला चांगले सहकार्य करावे. त्यामुळे त्यामध्ये यशस्वी होता येईल. जलयुक्त शिवार अभियानाची कामे करताना ती तांत्रिकदृष्ट्या तपासून पूर्ण करावीत. यानंतर डॉ. भगत, सरपंच धनपाल माहुरे यांनीही विचार व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व आमदार विजय रहांगडाले यांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी सुरेश निमजे यांनी केले.