स्व.गोपीनाथ मुंडे हे नीती व नियत असलेले नेतृत्व – रामविलास पासवान

0
10

नवी दिल्ली दि.३: उत्तम नेता, नीती आणि नियत या तिन्ही गुणांचा संगम स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये होता अशा शब्दात केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी त्यांचा प्रथम स्मृतीदिनी आदरांजली वाहिली. महाराष्ट्र सदन येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, खासदार चंद्रकांत खैरे, विजया रहाटकर, श्याम जाजू, निर्लेप कंपनीचे अध्यक्ष राम भोगले आदी उपस्थित होते.
श्री.पासवान म्हणाले, स्व. गोपीनाथ मुंडे अतिशय मागास असलेल्या समाजामधून आलेले होते. मुंडेंना त्याची जाणीव होती, म्हणूनच तळागळातील लोकांकरिता काम करण्यासाठी ते सदैव तत्पर राहीले. भारतीय जनता पक्षात मुंडेंनी आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. मुंडेंमध्ये व्यावहारीकपणा, दिलदार वृत्ती होती म्हणूनच त्यांच्या चाहत्यांची कमी नव्हती. मुंडे हे केवळ महाराष्ट्रापुरते नव्हते तर ते राष्ट्रीय स्तरावरील नेता बनले होते. एका ऊस तोडणी कामगाराचा मुलाची केंद्रात मंत्रीपदापर्यंतची वाटचाल थक्क करणारी होती. इतर मागासावर्गीय समाजाची जनगणना व्हावी त्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहीले.

श्री.जावडेकर यांनी मुंडे यांच्या सोबतचा 1972 ते 2 जून 2014 पर्यंत असलेला संबंधांचा प्रवास उलगडला. यामध्ये त्यांनी काढलेली संघर्ष यात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा तसेच कर्जमुक्ती आंदोलनाबद्दलच्या एकूण आठवणींचा उल्लेख केला.
खासदार चंद्रकांत खैरे, श्रीमती रहाटकर, श्याम जाजू, श्री. भोगले यांनी मनोगत व्यक्त केले. यासह दिल्लीतील टीव्ही 9 चे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास, दैनिक सामनाचे दिल्लीतील प्रतिनिधी निलेश कुलकर्णी यांनीही स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत व्यतीत केलेल्या आठवणी तसेच त्यांच्या व्यक्तीमत्वाचे इतर पैलू उलगडले. यावेळी महाराष्ट्र सदान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र सदनातील सहायक व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी केले. तर महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन स्व.गोपीनाथ मुंडे पुण्यस्मरण समितीच्यावतीने करण्यात आले होते.