खा.पटोले यांच्या हस्ते लिफ्ट,एस्केलेटर्स व शेड बांधकामाचे भूमीपूजन

0
7

गोंदिया,दि.४ : २६ मे ते ९ जून दरम्यान रेल्वे मार्फत सुरु असलेल्या रेल्वे प्रवासी पंधरवाड्याचे औचित्य साधून आज ४ जून रोजी गोंदिया रेल्वे स्टेशन येथे प्लॅट फॉर्म क्रमांक १ वर तयार होणाऱ्या लिफ्ट,एस्केलेटर्स व शेड बांधकामाचे भूमीपूजन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे प्रबंधक आलोक कंसल, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक तन्मय मुखोपाध्याय, रेल्वे समितीचे सदस्य रमणकुमार मेठी व रेल्वेचे इतर प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
गोंदिया रेल्वे स्थानकावर रॅम्पची व्यवस्था नसल्यामुळे अपंग व वृद्ध प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता, ७९ लक्ष रुपये खर्च करुन प्लॅट फॉर्म क्रमांक १ वर मार्च २०१६ पर्यंत लिफ्ट आणि १ कोटी ३४ लक्ष रुपये खर्चून एस्केलेटर्स व १ कोटी ९९ लक्ष रुपये खर्चून शेडचे बांधकाम करण्यात येणार आहे. भूमीपूजनानंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे प्रबंधक आलोक कंसल यांनी गोंदिया रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सोयी सुविधेसाठी असलेल्या सेवेची माहिती फोटो फिचर्सच्या माध्यमातून दिली. स्टेशनमधील स्वच्छता करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या आधुनिक यंत्रसामुग्रीची देखील माहिती दिली. श्री.कंसल यांनी माहिती देतांना सांगितले की, गोंदिया हे सर्वाधिक महत्वपूर्ण रेल्वेस्टेशन असून याठिकाणी प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. रेल्वे प्रवास करतांना प्रवाशांनी बोगीमधील कुठल्याही असुविधेसाठी टोल फ्री क्रमांक १३८ वर व रेल्वे सुरक्षा संदर्भात १८२ क्रमांकावर माहिती देऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.
गोंदिया रेल्वे स्थानकावरील मालधक्का हिरडामाली रेल्वे स्थानकावर स्थानांतरीत करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यावर काही संघटनांनी आक्षेप नोंदविला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या मार्फत सर्वसंमत्त्तीने तोडगा काढून हा प्रस्ताव पाठविला जाईल असेही कंसल यांनी सांगितले. उपस्थित नागरिकांनी रेल्वेमधील खानपानाच्या वस्तू एम.आर.पी.पेक्षा अधिक किमतीने विकल्या जाणाऱ्या वस्तू व इतर समस्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले असता प्रबंधक आलोक कंसल यांनी त्यांचे समाधानकारक उत्तर दिले.
खा.पटोले यांनी रेल्वे अधिकारी, रेल्वे यात्री समितीचे पदाधिकारी, पत्रकार व नागरिकांच्या उपस्थितीत रेल्वे सुविधा संदर्भात चर्चा केली. मालधक्का सुरु करण्यासाठी सर्वसंमत्तीने तोडगा काढून यासाठी सहकार्य केले जाईल असेही खा.नाना पटोले यांनी सांगितले.
येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात वैनगंगा महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे सांगून आपला ५ जून हा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करुन पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना व पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील १ लाख गरजू व गरीब व्यक्तींचा एका महिन्याच्या आत कार्यकर्त्यांकडून व्यक्तींची यादी घेऊन विमा काढणार असल्याची माहिती खा.नाना पटोले यांनी दिली. यावेळी सुरज गुप्ता, राजेश चतुर, दिपक कदम, संजय जैन, निलम हलमारे, गोकुल कटरे, सविता इसरका यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.