भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेसाठी 30 जूनला मतदान,2 जुर्लेला मतमोजणी

0
15

-राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांची माहिती
मुंबई, दि. 4: भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक; तसेच इतर सहा जिल्हा परिषदेच्या सहा निवडणूक विभाग आणि दहा जिल्ह्यांमधील 11 पंचायत समित्यांच्या 12 निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 30 जून 2015 रोजी मतदान; तर 2 जुलै 2015 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज केली.निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा व त्या अंतगर्तच्या पंचायत समित्या: भंडारा- जिल्हा परिषद. पंचायत समित्या- तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूर.गोंदिया- जिल्हा परिषद. पंचायत समित्या- गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडक अर्जूनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांसाठी आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल. 10 ते 15 जून 2015 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. 16 जून 2015 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल व त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे 19 जून 2015 पर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 22 जून 2015 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी तेथील निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अपील असलेल्या ठिकाणी 24 जून 2015 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी तेथेही निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
मतदान केंद्रांची यादी 24 जून 2015 रोजी प्रसिद्ध केली जाईल. 30 जून 2015 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होईल. केवळ गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी पंचायत समितीच्या दुर्गापूर निर्वाचक गणातील पोटनिडणुकीसाठी सकाळी 7.30 ते दुपारी 3 या वेळेत मतदान होईल. सर्व ठिकाणीच मतमोजणी 2 जुलै 2015 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्री सहारिया यांनी सांगितले.